वाळपई प्रतिनिधी
गोव्यामध्ये आप पक्षातर्फे वीज आंदोलन सुरू आहे .यासंदर्भात जनजागृती करण्याच्या दृष्टिकोनातून होंडा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या कोपरा बैठक वाळपई पोलिसांनी उधळून लावली .सदर बैठक बेकायदेशीर असून यासंदर्भात गुन्हा आप पक्षाचे कार्यकर्ते संदेश तळेकर यांच्यावर दाखल करण्यात आलेला आहे. त्याच्यावर भाजप कलम 151 खाली गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटक करण्यात आलेली आहे.
रात्री उशिरापर्यंत यासंदर्भात कागदोपत्री सोपस्कार सुरू होता. यासंदर्भात माहिती अशी की आम आदमी पक्षातर्फे गोव्यामध्ये आंदोलन सुरू आहे. विजेच्या बाबतीत सरकारने ग्राहकांना मोठय़ा प्रमाणात सूट द्यावी अशा प्रकारची मागणी करीत सर्वत्र जनजागृती करण्याच्या दृष्टिकोनातून सदर आंदोलन सुरू आहे .अशा प्रकारच्या आंदोलनाचा एक भाग म्हणून या ठिकाणी जनजागृती सभा आयोजित करण्यात आली होती .सभा सुरू होण्याअगोदर पोलिसांनी सदर सभेला आक्षेप घेतला व ही सभा पूर्णपणे बेकायदेशीर असून ती सुरु करता येणार नसल्याचे स्पष्ट केले. ही सभा बंद करण्याचे निर्देश केले. तरीसुद्धा सभा सुरू करण्यात आल्यामुळे सभेला संबोधित करणारे पक्षाचे कार्यकर्ते संदेश तळेकर यांचा वाळपई पोलिसांनाही 151 खाली अटक करून वाळपई पोलीस स्थानकावर दाखल करून घेतले आहे. यासंदर्भात पोलिस निरीक्षक महेश गडेकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की सध्या तरी संदेश तळेकर यांना भादस 151 खाली अटक करण्यात आलेली आहे. यासंदर्भाची कागदपत्रे प्रक्रिया सुरू असून याला बऱयाच प्रमाणात उशीर लागणार असल्याचे यावेळी त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान या संदर्भाची बातमी पसरताच गोव्यातील या पक्षाचे काही कार्यकर्ते वाळपई पोलीस स्थानकावर जमा झाले होते.
यासंदर्भात पत्रकांराशी बोलताना या पक्षाचे युवा नेते निखिल हळदणकर यांनी या प्रकरणामागे भाजपचे कारस्थान असल्याचा आरोप केला.
आप आदमी पक्षाच्या विज आंदोलनाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे .यामुळे विद्यमान सरकारचे धाबे दणाणले असून यामुळे अशा बैठकांना आडकाठी निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप यावेळी त्यांनी केला .आप पक्ष काँग्रेस पक्षासारखा नाही. हा पक्ष कधीही मागे हटणार नसून या पक्षाचे आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशारा यावेळी त्यांनी दिला. सध्या अटक करण्यात आलेल्या संदेश तळेकर यांच्याविरोधात वाळपई पोलीस स्थानकावर धरणै धरण्याचा कार्यक्रम आयोजित करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.