वीजमंत्र्यांच्या आदेशानंतर मोहीम सुरू
प्रतिनिधी /पणजी
गेले काही दिवस तृणमूल काँग्रेसने सुरू केलेल्या पोस्टर बाजीला प्रत्युत्तर म्हणून ‘आप’ ने देखील गोव्यातील प्रमुख ठिकाणी आणि विशेषतः वीज खांबांवर लावण्यात आलेले पोस्टर्स, बॅनर्स आणि झेंडे काढून टाकण्याचे आदेश वीजमंत्री नीलेश काब्राल यांनी वीज अधिकाऱयांना दिले होते. त्यानंतर त्यासंदर्भातील आदेश वीज खात्याने जारी केला आणि गोव्याच्या विविध भागातले बॅनर्स, पोस्टर्स काढण्यास प्रारंभ झाला. तृणमूल काँग्रेसच्या काही उत्साही कार्यकर्त्यांनी तथा कंपनीने नियुक्त केलेल्या ठेकेदाराने राज्यातील सर्व प्रमुख सार्वजनिक ठिकाणी तृणमूलचे पोस्टर्स, झेंडे उभारण्यात आले. त्याचबरोबर त्याला प्रत्युत्तर म्हणून आपने देखील आपले झेंडे व पोस्टर्स लावले. यातून सार्वजनिक ठिकाणी विद्रूपीकरण झाले. शिवाय राज्यात सत्तेवर असलेल्या भाजपला हे सारे असहय़ वाटू लागले. आश्चर्य म्हणजे या दोन्ही राजकीय पक्षांनी वीज खात्याकडून अधिकृत परवानगी देखील मिळविलेली नाही. कुडचडेमध्ये मंत्र्यांनी दिलेल्या आदेशानंतर वीज खात्याच्या कर्मचाऱयांनी वीज खांबांवरील तृणमूलचे झेंडे खेचून काढले. पालिकेने देखील कारवाई केली. जाईल तिथे ममता बॅनर्जी यांचे पोस्टर्स लावण्यात आले होते ते सर्व ताब्यात घेतले. राज्यातील बहुतांश वीज खांबांवर आप व तृणमूलने अतिक्रमण केले होते, ते त्वरित काढून टाका असा आदेश वीजमंत्री नीलेश काब्राल यांनी वीज अधिकाऱयांना दिला आणि सायंकाळी हे बॅनर्स, पोस्टर्स आणि झेंडे त्वरित काढून टाकण्याचे आदेश जारी केले.