प्रतिनिधी / सांगे
वाकर-मुगोळी, सांगे येथे वीज वाहिन्याला अगदी टेकून असलेल्या सागवानच्या झाडाच्या फांदी कापण्यासाठी झाडावर चडलेले मनोहर हरिजन (62) यांचा विद्दूत भारीत तारांशी संपर्क आल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. याबद्दल हळहळ व्यक्त होत आहे.
मूळ उगें येथील मनोहर हरिजन यांनी वाकर-मुगोळी येथे जमीन घेऊन लहानसे घर बांधले होते. घरापासून जवळच सागवांनचे झाड व त्याला भिडूनच वीजेचा खांब आहे. मयत मनोहर हरिजन हा मासे विकण्याचा व्यवसाय करीत असून बुधवारी दुपारी 11.30 च्या दरम्यान घरी येऊन सदर झाडाच्या फांदय़ा छाटण्यासाठी झाडावर चढला. त्यावेळी त्याचा संपर्क विद्द्त भारित तारांशी आल्याने शॉक लागल्याने तो झाड व खांब्यावर लोंबकळत राहिला. त्यातच त्याचा दुर्देवी अंत झाला.
मयत हरिजन गेली अनेक वर्षे मासे विक्री व्यवसायात होता. या घटनेची खबर कुडचडे येथील अग्निशमन दल व आपत्कालीन सेवेला दिल्यानंतर हवालदार प्रशांत सांगोडकर, फायर फायटर के. सी. मोहन, जी. बी. लांबोर, पी. के. रेकडो, एन. ए. नाईक व ए. आर. बांदोडकर यांनी घटनास्थळी भेट देऊन मृतदेह झाडावरून खाली काढला.
सांगे पोलीस स्थानकाचे पोलीस उपनिरीक्षक हरिष नाईक यांनी पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणी करून नाते वाईकाकडे सुपूर्द करण्यात आला आहे.
घटनास्थळी सांगेचे आमदार प्रसाद गावकर यांनी भेट देऊन मयताच्या नातेवायिकांचे सांत्वन केले आहे. यावेळी वीज खात्याचे अधिकारी उपस्थित होते.