हुक्केरी वीज संघाची बैठक ः मंत्री उमेश कत्ती यांची मागणी : हुक्केरी संघाची व्याजासह 168 कोटीची थकबाकी
वार्ताहर / हुक्केरी
हुक्केरी ग्रामीण विद्युत सहकारी संघाचे व्याज रुपात आकारण्यात आलेली 115 कोटी रुपयांची रक्कम हेस्कॉमने माफ करावी, अशी विनंती हुक्केरी वीज संघाचे मार्गदर्शक व मंत्री उमेश कत्ती यांनी मंत्री व्ही. सुनीलकुमार यांच्याकडे केली. ते मंत्री सुनीलकुमार यांच्या उपस्थितीत घेण्यात आलेल्या हुक्केरी ग्रामीण वीज संघाच्या संचालक मंडळाच्या बैठकीत बोलत होते.
गत दोन वर्षांपासून होत असलेल्या अतिवृष्टीमुळे येथील वीज संघाला कोटय़वधी रुपयांचे नुकसान झाले आहे. तरीही ग्राहकांना कोणतीही समस्या होऊ नये यासाठी सुरळीत वीजपुरवठा करण्यात येत आहे. हेस्कॉमची वीजबिलाची 168 कोटी 83 लाख रुपयांची थकबाकी जमा करावयाची आहे. यामध्ये 115 कोटी रुपयांच्या व्याजाचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे वीज संघाला कर्जाच्या खाईत लोटणारी थकबाकी असल्याने सदर व्याजाची असलेली 115 कोटी रुपयांची रक्कम माफ करावी, अशी मागणी मंत्री उमेश कत्ती व वीजसंघाच्या संचालकांनी सचिवांकडे पत्राद्वारे केली आहे.
484 कोटीचा सरकारकडे प्रस्ताव
केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी आरडीएस योजनेंतर्गत 484 कोटी रुपये मंजुरीसाठी सरकारकडे प्रस्ताव पाठविला असून तो मंजूर करावा, शेतकऱयांना सुरळीत वीज पुरवठय़ासाठी बेळवी, निडसोशी, शेकीनहासूर व पाच्छापूर गावातील शेतकऱयांना ट्रान्स्फॉर्मर बसविण्यासाठी जागा मंजूर करावी, यासाठी मंत्र्यांनी केपीटीसीएल अधिकारी संघाच्या प्रस्तावाला अनुमोदन देण्यास आदेश करावा, अशी विनंती संचालक मंडळाने केली.
यावेळी मंत्री व्ही. सुनीलकुमार यांनी, कत्ती बंधूंच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील एकमेव वीज संघ व्यवस्थित सुरू आहे, शेतकरीवर्गाला संघ लाभदायक ठरला आहे. संघाचा प्रस्ताव आणि येथील पाहणी करून जास्तीत जास्त अनुदानासाठी सहकार्य करू, असे सांगितले.
यावेळी मंत्री व्ही. सुनीलकुमार यांचा संघाचे अध्यक्ष कलगौडा पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सभेत संचालक पृथ्वी कत्ती, अशोक चंदाप्पगोळ, जयगौडा पाटील, बसगौडा मग्गेण्णावर, के. के. बेनचीनमर्डी, रविंद्र हिडकल, कुणाल पाटील, जोमलिंग पटोळी, व्यवस्थापक संचालक के. एल. श्रीनिवास, अभियंते नेमिनाथ खेमलापुरे व अधिकारीवर्ग उपस्थित होते.