शिवापूर येथे लष्करी इतमामात अंत्यसंस्कार
वार्ताहर /घटप्रभा
नागालँड येथे भारत-म्यानमार सीमेवर गस्त घालत असताना वाहनास अपघात झाल्यामुळे वीरमरण आलेल्या मंजुनाथ अप्पण्णा गौडण्णवर यांच्या पार्थिवावर त्यांच्या मूळगावी शिवापूर-कोण्णूर (ता. गोकाक) येथे सोमवारी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
मंजुनाथ यांचे पार्थिव नागालँड येथून दिल्लीमार्गे बेंगळूर येथे विमानातून आणण्यात आले.
तेथून लष्कराच्या रुग्णवाहिकेतून पार्थिव शिवापूर-कोण्णूर येथे सोमवारी सकाळी 7 वाजता आणण्यात आले. संपूर्ण गावातील मार्गावर रांगोळी काढून मंजुनाथ यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. पार्थिव ठेवण्यासाठी विशेष मंडपाची उभारणी करण्यात आली होती. मंजुनाथ यांच्या कुटुंबीयांनी पार्थिवाचे दर्शन घेतल्यानंतर मंजुनाथ यांनी प्राथमिक शिक्षण घेतलेल्या गावातील शाळेच्या प्रांगणात पार्थिव सार्वजनिकांच्या दर्शनासाठी ठेवण्यात आले. अंत्यदर्शनासाठी शिवापूरसह घोडगेरी, सावळगी, मुत्नाळ, खानापूर, नंदगाव, कोण्णूरसह परिसरातील गावच्या नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
खासदार मंगला अंगडी, आमदार रमेश जारकीहोळी, जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ, तहसीलदार प्रकाश होळेप्पागोळ यांच्यासह बेळगाव येथील लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱयांनी पार्थिवाचे दर्शन घेत पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली वाहिली. यानंतर गावातील प्रमुख मार्गावरून मंजुनाथ यांच्या पार्थिवाची अंत्ययात्रा काढण्यात आली. भारत माता की जय, अमर रहे अमर रहे मंजुनाथ अमर रहे… आदी घोषणा यावेळी देण्यात आल्या. अंत्यविधीप्रसंगी जवानांनी हवेत फैरी झाडून मंजुनाथ यांना मानवंदना दिली.