बँक, हायस्पीड रेल्वे, सब-वे नेटवर्क, बससेवेस प्रारंभ : हॉटेल अन् रेस्टॉरंटही झाले खुले
चीनच्या वुहान शहरातूनच कोरोना विषाणू जगभरात फैलावला होता. परंतु आता वुहान शहरातील स्थिती पूर्वपदावर येऊ लागली आहे. शनिवारपासून तेथे रेल्वे, सब-वे नेटवर्क, बस आणि बँकिंग सेवा पुन्हा सुरू झाली आहे. वाहन उद्योगासह अनेक क्षेत्रांमधील 50 मोठय़ा कंपन्यांनीही काम सुरू केले आहे. 182 मेट्रोस्थानके खुली झाल्याने गर्दी दिसून येतेय. शहरात बाहेरील लोकांना प्रवेशाची अनुमती असली तरीही येथून बाहेर पडता येणार नाही. 8 एप्रिलनंतर शहरातून बाहेर पडण्यास देखील अनुमती मिळणार आहे.
वुहानमध्ये शनिवारी हायस्पीड रेल्वेने 12 हजार प्रवासी दाखल झाले आहेत. प्रवाशांना एक आसन सोडून बसविले जात आहे. काही शॉपिंग स्टोअर देखील खुले झाले आहेत. 65 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या लोकांना सार्वजनिक वाहतूक सेवेचा वापर न करण्याची सूचना करण्यात आली आहे. 180 बसेस मार्ग सुरू करण्यात आले आहेत.
हजमॅट सूट परिधान
वुहानच्या स्थानकांमध्ये 200 इन्फ्रारेड इंटेलिजेंट टेम्प्रेचर मॉनिटरिंग उपकरणे बसविली आहेत. या उपकरणांद्वारे लोकांच्या शरीराचे तापमान पडताळून पाहिले जात आहे. स्थानकांवर पोहोचणारे प्रवासी दोन मास्क, ग्लोव्ह्ज आणि हजमॅट सूट परिधान करून पोहोचत आहेत. हजमॅट सूट शरीराचे रसायने आणि विषाणूपासून रक्षण करतो. वुहान स्थानकाचा कर्मचारी वर्ग देखील पूर्णपणे सुरक्षा उपकरणांने सज्ज आहे. स्वागत कक्षावर विदेशातून आलेल्या लोकांना विलग केले जात आहे. सर्व प्रवाशांच्या मोबाईलवर ग्रीन कोड दिसतो आणि यातून त्यांच्या आरोग्यासंबंधी माहिती समजून येते. ग्रीन कोड नसणाऱया प्रवाशांना न्यूक्लिक टेस्टला तोंड द्यावे लागते.
हॉटेलची सुविधा
वुहान आणि हुआंगांग शहरातील काही हॉटेल्स आणि रेस्टॉरंट सुरू झाले आहेत. परंतु तेथे बसून खाता येत नाही. खाद्यपदार्थ घरी नेण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली.
युरोपसाठी मालवाहतूक
चीनपासून युरोपपर्यंत धावणाऱया मालगाडीची सेवा पुन्हा सुरू झाली आहे. वुहानच्या वुजिशान स्थानकावरून शनिवारी ही रेल्वे 166.4 टन वैद्यकीय सामग्रीसह रवाना झाली आहे. या मालगाडीत सर्जिकल टॉवेल, प्लास्टिक बॅग, मेडिकल टेबल क्लॉथ इत्यादी सामग्री आहे. ही रेल्वे 15 दिवसांनी जर्मनीच्या डुईसबर्ग येथे पोहोचेल.आठवडय़ातून एकदा विमानसेवा
कोरोना पुन्हा फैलावण्यापासून रोखण्यासाठी चीनने विदेशी नागरिकांच्या प्रवेशावर बंदी घातली आहे. चीनचा व्हिसा किंवा वास्तव्य परवाना असणाऱया व्यक्तींनाही नव्याने अर्ज करावा लागणार आहे. तसेच चीनमधून आता प्रत्येक देशासाठी आठवडय़ाला एक विमान रवाना होणार आहे. या विमानातही 75 टक्क्यांपेक्षा अधिक प्रवासी नसतील.