चीनमधील कोरोना संकट : नागरिक ठरताहेत परस्परांचे शत्रू : पोलादी मूठ घट्ट
वृत्तसंस्था/ गुआंगझाऊ
कोरोना विषाणूला रोखण्यासाठी चीनची केविलवाणी धडपड त्याच्या नागरिकांसाठीच गंभीर संकटाचे कारण ठरत आहे. विषाणूच्या फैलावाचे मुख्य केंद्र मानले जाणाऱया वुहानचे नागरिक मायदेशातच ‘अस्पृश्य’ ठरले आहेत. वुहानवासीयांच्या शोधासाठी चीन सरकारने इनाम घोषित केल्याने एक शेजारी दुसऱयाचा ‘शत्रू’ ठरत आहे. विषाणू संसर्गाची लक्षणे नसणाऱया वुहानच्या लोकांनाही बळजबरीने ताब्यात घेतले जात आहे.
वुहान हे चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांचेही शहर आहे. पण हे शहर आता निर्मनुष्य ठरण्याची चिन्हे आहेत. वुहानमधून कोरोना विषाणूचा फैलाव झाला असून आतापर्यंत 420 जणांचा मृत्यू झाला आहे.
टेहळणी यंत्रणेचा वापर
गूढ आजाराचे वाहक होण्याची भीती असल्याने चीनचे लाखो लोक घरी जाणे टाळत आहेत. कोरोना रोखण्यासाठी सरकारने देशभरात टेहळणी यंत्रणा निर्माण केले असून यात चेहऱयांची ओळख पटविणारे तंत्रज्ञान आणि उच्च क्षमतेच्या कॅमेऱयांचा अंतर्भाव आहे. यंत्रणेच्या माध्यमातून सर्वच ठिकाणी नागरिकांवर नजर ठेवली जात आहे.
नागरिकांची यादी
नववर्षानिमित्त अन्य भागांमध्ये गेलेल्या वुहानच्या नागरिकांना शोधून पकडण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. झेंगझियांग प्रांतात राहणाऱया लिनहाईला अधिकाऱयांनी 5 दिवसांनी शोधून काढत एका खोलीत बळजबरीने कोंडून ठेवले आहे. लिनहान किंवा त्याच्या कुटुंबाचा सदस्य घरातून बाहेर पडल्यास याची माहिती हॉटलाईनवर द्या, असे पोलिसांनी शेजाऱयांना बजावले आहे. हेबईमध्ये वुहानमधून परतलेल्या लोकांसंबंधी माहिती देणाऱयास 10 हजार रुपयांचे इनाम घोषित करण्यात आले आहे.
अत्यंत कठोर पाऊल
अनेक भागांमधील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आल्याने चीन आणि जगादरम्यान आभासी भिंत उभी राहिली आहे. लोकांना अशाप्रकारे वेगळे केल्याने तोटाच होईल. या कृतीमुळे आजारी लोक लपून राहू लागतील, असे तज्ञांनी बजावले आहे. लोकांना शहराबाहेर पडता येऊ नये याकरता रस्तेच खणून काढण्यात आल्याचे समजते.
घराला तुरुंगाचे स्वरुप
जिआंगसू प्रांतात अधिकाऱयांनी वुहानमधून परतलेल्या कुटुंबाला लोखंडी खांब उभे करून घरात कैद केले आहे. या कुटुंबाला अन्नासाठी शेजाऱयांवर अवलंबून रहावे लागत आहे. वुहानच्या लोकांना हॉटेल किंवा नातलगांकडे राहण्याची जागा मिळत नसल्याने दारोदारी भटकावे लागत आहे.