जागतिक आरोग्य संघटना अन् चिनी तज्ञांचा दावा
वृत्तसंस्था / वुहान
चीनच्या एका प्रयोगशाळेतून कोरोना विषाणू फैलावण्याची शक्यता नसल्याचे जागतिक आरोग्य संघटनेच्या एका तज्ञाने म्हटले आहे. विषाणूने एखाद्या मध्यवर्ती प्रजातीद्वारे मानवी शरीरात प्रवेश केला असण्याची शक्यता आहे. डब्ल्यूएचओचे खाद्यसुरक्षा तसेच जंतूरोग तज्ञ पीटर बेन एम्बारेक यांनी चीनच्या वुहान शहरात कोरोना विषाणूची उत्पत्ती झाल्याच्या दाव्याच्या चौकशीनंतर मंगळवारी हा दावा केला आहे.
डिसेंबर 2019 पूर्वी वुहान शहरात कोरोना विषाणूचे कुठलेच संकेत नव्हते असे जागतिक आरोग्य संघटनेने स्पष्ट केले आहे. डिसेंबर 201 पूर्वी तेथील लोकांमध्ये कोरोनाचा संसर्ग झाल्याचे कुठलेच संकेत नाही. त्यापूर्वी कोरोनाचा शहरात फैलाव झाल्याचेही कुठलेच पुरावे प्राप्त झाले नसल्याचे जागतिक आरोग्य संघटना आणि चिनी तज्ञांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे.
वुहानमधील तपासात कोरोनासंबंधी अनेक नव्या गोष्टी समोर आल्या आहेत. पथकाला डिसेंबर 2019 मध्ये वुहान मांसबाजाराबाहेर फैलाव झाल्याचे पुरावे मिळाले आहेत. दरम्यान वुहान किंवा अन्यत्र डिसेंबर 2019 पूर्वी कोरोनाचा मोठय़ा प्रमाणात उद्रेक झाल्याचा पुरावा पथकाला सापडला नसल्याचे बेन एम्बेक यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.
जगात वुहानमध्येच डिसेंबर 2019 मध्ये कोरोना विषाणूच्या संक्रमणाचा पहिला रुग्ण आढळला होता. त्यानंतर अमेरिकेसह अनेक देशांनी चीनच्या वुहान येथील जैवप्रयोगशाळेतून कोरोना विषाणूचा फैलाव झाल्याचा संशय व्यक्त केला होता. याचबरोबर चीनच्या मांसबाजारातूनही कोरोना संक्रमण फैलावल्याचा दावा करण्यात आला होता.
प्राण्यांवर आता लक्ष केंद्रीत
जागतिक आरोग्य संघटनेच्या पत्रकार परिषदेत सिंघुआ विद्यापीठातील चिनी तज्ञ लियांग वानियान यांनी सार्स-कोव-2 हा विषाणू वटवाघूळ आणि खवले मांजरात आढळून येत असल्याचे सांगितले. हा विषाणू फैलावण्यामागे हे प्राणी कारणीभूत असू शकतात. कारण कोरोनाचे विषाणू आणि सार्स यांच्यात उच्च समानता आढळून आली आहे. पण या प्रजातींपैकी कुणामध्येही आतापर्यंत ओळखण्यात आलेल्या सार्स-कोव-2 या विषाणूशी प्रत्यक्ष संबंध दिसून आलेला नसल्याचे वानियान यांनी म्हटले आहे.
मध्यस्थ प्रजाती
एका मध्यस्थ प्रजातीच्या माध्यमातून संक्रमण फैलावल्याची सर्वाधिक शक्यता आहे. हे सिद्ध करण्यासाठी अधिक अध्ययन आणि अधिक विशिष्ट संशोधनाची गरज भासणार आहे. एका प्रयोगशाळेतून हा संसर्ग फैलावण्याची कल्पना करणे योग्य नसल्याचे निष्कर्ष मांडत असल्याचे तज्ञांकडून म्हटले गेले.