ऑनलाईन टीम / बीजिंग :
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मागील तीन महिन्यांपासून बंद असलेल्या चीनच्या वुहान शहरातील प्राण्यांच्या बाजारपेठा पुन्हा सुरू झाल्या आहेत. या बाजारपेठांमध्ये कुत्रा, मांजर आणि वटवाघुळाचे मांस विकले जात आहे.
चीनमधील कोरोनाचा संसर्ग काही प्रमाणात कमी झाल्याने चीनने देशभरातील लॉकडाऊन मागे घेतला आहे. त्यामुळे चीनच्या बाजारामध्ये पुन्हा एकदा वटवाघुळ, कुत्री, मांजरी, विंचू आणि इतर प्राण्यांचे मांस विक्रीस ठेवण्यात आले आहे.
वुहानमधील एका मांस बाजारातून मनुष्यामध्ये कोरोना विषाणू पसरला होता. नंतर त्याने संपुर्ण जगाला विळखा घातला. आतापर्यंत जगभरातील 7 लाख 85 हजार जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर 37 हजार 800 लोकांचा बळी गेला आहे. चीनमध्ये 81 हजार 500 जणांना याचा संसर्ग होऊन 3300 जण दगावले आहेत.