ऑनलाईन टीम / बीजिंग :
चीनच्या हुबेई प्रांतातील वुहान शहरात पुन्हा नवे सहा रुग्ण आढळून आले आहेत. मागील 30 दिवसांपासून हे शहर कोरोनामुक्त झाले होते. शनिवारी या शहरात अचानक कोरोनाचा एक रुग्ण आढळला. त्यानंतर रुग्णांची संख्या 6 वर पोहचली.
वुहान शहरातून कोरोनाचा जगभर प्रसार झाला असला तरी कोरोनाला रोखण्यात चीनला यश आले होते. मागील 30 दिवसांपासून तिथे कोरोनाचा एकही रुग्ण आढळून आला नव्हता. शनिवारी वुहानमधील सन्मिन भागात कोरोनाचा एक रुग्ण आढळला. त्यानंतर रविवारी पुन्हा पाच नव्या रुग्णांची नोंद झाली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियोजनात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत कम्युनिस्ट पक्षाच्या चँगछिंग स्ट्रीट कार्यकारिणीचे सचिव झांग युशीन यांची पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. चीनमध्ये आतापर्यंत 82 हजार 919 कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर 4633 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.