76 दिवसांनी टाळेबंदी संपुष्टात : पहिल्याच दिवशी अनेकांनी शहर सोडले
जगात कोरोना विषाणूचे केंद्रबिंदू राहिलेल्या चीनच्या वुहानमध्ये बुधवारी काही अटींसह 76 दिवसांनी टाळेबंदी हटविण्यात आली आहे. या नव्या पहाटेचा पूर्ण शहराने उत्साहात स्वागत केले आहे. शहराच्या इमारतींना रोषणाईने सजविण्यात आले होते. काही इमारतींवर रात्री उशिरा 12 वाजण्यापूर्वी लॉकडाउन संपण्याची उलटी गणना सुरू करण्यात आली. तर हजारोंच्या संख्येत लोकांनी वुहानमधून बाहेर पडणे पसंत केले आहे. प्रवासावरील बंदी हटविण्यात आल्यावर हजारोंच्या संख्येत रस्ते, हवाई आणि रेल्वेमार्गाने लोक वुहानमधून बाहेर पडताना दिसून आले आहेत.
55 हजार लोक बुधवारी वुहानमधून बाहेर पडतील अशी अपेक्षा होती असे चीनच्या नॅशनल रेल्वे सर्व्हिसने म्हटले आहे. शहरात अद्यापही कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी अत्यंत कठोर निर्बंध लादण्यात आले आहेत. अत्यावश्यक असेल तरच घरातून बाहेर पडा असे अधिकारी जनतेला सांगत आहेत. परंतु कंपन्या स्वतःच्या कर्मचाऱयांना कामावर बोलावू लागल्या आहेत.