ऑनलाईन टीम / बीजिंग :
चीनच्या हुबेई प्रांतातील वुहान शहर कोरोनामुक्त झाले आहे. वुहानमधील तब्बल एक कोटी लोकांची चाचणी करण्यात आली. त्यामध्ये एकही रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळला नाही.
एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात वुहान कोरोनामुक्त झाले होते. मात्र, 36 दिवसांनंतर वुहानमध्ये पुन्हा नव्याने सहा रुग्ण आढळल्यानंतर तेथील आरोग्य प्रशासनाने शहरातील सर्व नागरिकांची कोरोना टेस्ट करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार वुहानमधील सर्व नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात आली. या चाचणीमध्ये एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला नाही.
शुक्रवारी वुहानमधील शेवटचे तीन रुग्ण बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आल्याचे वृत्त चीनमधील एका सरकारी वृत्तपत्राने दिले आहे. तरी देखील बुधवारी कोरोनाची कोणतीही लक्षणे नसलेले 245 रुग्ण वुहानमध्ये असल्याचे समोर आले आहे. चीनमध्ये आतापर्यंत 83 हजार 027 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर 4634 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.