वार्ताहर/ औंध
औंध येथील मुळपीठ डोंगरावर शिवसंकल्प प्रतिष्ठानने लॉकडाऊनच्या काळात युवा सभासदाकडून वृक्षारोपण करण्यासाठी तब्बल 100 खड्डे काढले आहेत. पावसाच्या अगोदर वृक्षारोपणाची तयारी केली आहे. पोषक पाऊस झाला की या खड्डय़ात वृक्षारोपण करण्यात येणार आहे.
औंध येथील विविध सामाजिक संघटना अनेक उपक्रम वर्षभर राबवित असतात.,शिवसंकल्प प्रतिष्ठान यामध्ये अग्रेसर आहे. प्रतिष्ठानच्या वतीने गेल्या वर्षी देखील मुळपीठ डोंगर,एस टी स्टँड परिसर आदी ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले होते. लावलेली झाडे जगविण्यासाठी खास करून उन्हाळ्यात त्यांनी विशेष परिश्रम घेतले आहेत.
यंदा देखील वृक्षारोपण करण्यासाठी शिवसंकल्पने तयारी केली आहे. लाँकडाऊन काळात सभासदांच्या माध्यमातून मूळपीठ डोंगरावर खड्डे काढून घेतले आहेत.
पहिल्या पावसात जमिनीत ओलावा तयार झाला की विविध प्रकारची झाडे या खड्डय़ात लावण्यात येणार आहेत, यामध्ये कडुलिंब, पिंपळ, पुत्रजिवा, रक्तपुष्प, कोर्डीया, बहावा, महोगणी,बेहडा, जांभुळ, चिंच, रेनट्री,बांबू,आपटा,बदाम, गुलमोहर, चेरी, कांचन,करंज,वड, गुळभेंडी,पिंपरण आदींसह सर्व देशी प्रकारची झाडे आणण्याचे नियोजन पूर्ण झाले आहे. त्यामुळे आता मुळपीठ डोंगर परिसर खुलून दिसणार आहे.निसर्गाने औंधला एक वेगळे वरदान दिले आहे,मुळपीठ व जोतिबा डोंगर समोरासमोर असुन पावसाळ्यात बाहेरून येणाया भाविक पर्यटकांना हे आकर्षित करीत असतात.हेच निसर्गाने दिलेले देणे जपण्यासाठी औंधकर नेहमी प्रयत्नशील असतात.
औंधचे नैसर्गिक सौंदर्य टिकवण्यासाठी प्रयत्नशील
शिवसंकल्पच्या माध्यमातून वृक्षारोपणाबरोबर वृक्षसंवर्धनाचे कामही केले जाते. झाड पूर्ण क्षमतेने लागून निघेपर्यंत देखभाल सुरू असते., झाडांच्या संरक्षणासाठी उपाययोजना सुरू असतात.झाडे जगविण्यासाठी आमचे सर्व सभासद खूप मेहनत घेतात,औंधचे नैसर्गिक सौंदर्य टिकविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहे. मुळपीठ डोंगराला हरित मुळपीठ करण्यासाठी सर्व औंधकरांचे प्रयत्न सुरू आहेत.