‘पीएम स्पेशल’मध्ये एक लाख लोकांना मिळणार रोजगार
@ वृत्तसंस्था / नवी दिल्ली
केंद्र सरकार आता वृद्धांच्या देखभालीसाठी नवी योजना सुरू करणार आहे. या योजनेचे नाव ‘पीएम स्पेशल’ असणार आहे. याच्या अंतर्गत वृद्धांना घरबसल्या वैद्यकीय देखभालीची सेवा प्रदान केली जाणार आहे. या योजनेमुळे वृद्धापकाळात लोकांची देखभाल करणाऱया प्रशिक्षित कर्मचाऱयांची विश्वासार्ह यंत्रणा तयार होणार आहे. तसेच प्रशिक्षित कर्मचाऱयांसाठी येणारा खर्चही कमी होणार आहे.
केंद्र सरकार या योजनेच्या अंतर्गत पुढील तीन वर्षांमध्ये जवळपास एक लाख लोकांना गेरीआट्रिक गिव्हर-गिव्हर्सचे (वृद्धकल्याणाचे शास्त्र) प्रशिक्षण देणार आहे. सामाजिक न्याय मंत्रालय एक आठवडय़ात प्रशिक्षण कार्यक्रमास सुरुवात करणार आहे. सरकारकडून एक ऑनलाइन पोर्टल तयार केले जाणार असून त्यावर सर्व नोंदणीकृत आणि ट्रेंड गेरिएट्रिक प्रोफेशनल्सची यादी असणार आहे. हे एकप्रकारे ई-मार्केट प्लेसप्रमाणे असणार आहे. या पोर्टलवर वृद्धांच्या देखभालीसाठी स्वतःच्या सुविधेनुसार प्रोफेशनल्सची उपलब्धता पाहता येईल तसेच त्यांची सेवा मिळविता येणार आहे. ही वेबसाइट सप्टेंबरपर्यंत सुरू होण्याची अपेक्षा आहे.
गेरीआट्रिक प्रोफेशनल्सची आवश्यकता आतापर्यंत योग्यप्रकारे पूर्ण करता आलेली नाही. वृद्धांच्या देखभालीसाठी पुरेशा प्रमाणात प्रशिक्षित प्रोफेशनल्स नाहीत किंवा त्यांच्याबद्दल लोकांना माहिती नाही. अशा स्थितीत अनेकदा अप्रशिक्षित लोक देखील हे काम करू लागतात, यामुळे वृद्धांची प्रकृती आणि देखभाल सुरक्षित हातांमध्ये राहत नाही. याचबरोबर देखभालीचा खर्चही अधिक असतो असे सामाजिक कल्याण मंत्रालयाचे सचिव आर. सुब्रमण्यम यांनी म्हटले आहे.
सरकार आता प्रोफेशनल पद्धतीने याची यंत्रणा तयार करत असून याला आरोग्य मंत्रालयाची मान्यताप्राप्त असणार आहे. यामुळे वृद्धांना गुणवत्तापूर्ण देखभाल मिळू शकेल तसेच खर्च देखील पूर्वीच्या तुलनेत कमी असणार आहे. गेरीआट्रिक प्रोफेशनल होण्यासाठी प्रशिक्षण मिळविण्यासाठी 12 वी उत्तीर्ण कुठलाही व्यक्ती अर्ज करू शकतो. सरकार यादरम्यान अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती तसेच अन्य मागास समुदायांमधील किमान 10 हजार लोकांना मोफत प्रशिक्षण देणार आहे. या योजनेमुळे कमीतकमी एक लाख लोकांना रोजगार मिळणार असल्याचे सुब्रमण्यम यांनी म्हटले आहे.