मतदानासाठी निवडणूक विभागाकडून अधिकाऱयांची नियुक्ती : मतदान प्रक्रियेवेळी दबाव टाकण्याचा प्रयत्न
प्रतिनिधी / बेळगाव
कोरोना विषाणूच्या प्रसारामुळे 80 वर्षावरील वृद्ध नागरिकांना घरबसल्या पोस्टल बॅलेटद्वारे मतदान करण्याची मुभा देण्यात आली आहे. यानुसार गुरुवारी पोस्टल मतदानास प्रारंभ करण्यात आला असून, शहर आणि उपनगरात वृद्ध नागरिकांनी घरबसल्या मतदानाचा हक्क बजावला. काही नागरिकांनी मतदान केंद्रावर मतदान करण्याची इच्छा व्यक्त केली.
वृद्ध नागरिकांना तसेच दिव्यांगांना मतदान केंद्रावर जाऊन मतदान करणे अडचणीचे ठरते. सध्या कोरोना विषाणूंचा प्रसार वाढत चालल्याने खबरदारी म्हणून निवडणूक आयोगाने पोस्टल बॅलेटद्वारा मतदान करण्याची मुभा उपलब्ध करून दिली आहे. याकरिता बीएलओमार्फत नोंदणी करून घेण्यात आली होती. शहरातील 1375 नागरिकांनी पोस्टल बॅलेटद्वारे मतदान करण्यासाठी नोंदणी केली होती. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार पोलींग एजंटांची तसेच प्रिसायडिंग ऑफिसरची नियुक्ती करून पोस्टल बॅलेटद्वारा मतदान प्रक्रिया गुरुवारपासून सुरू करण्यात आली आहे. गुरुवारी सकाळी 7 पासून या मतदान प्रक्रियेला प्रारंभ करण्यात आला असून, पोस्टल बॅलेटद्वारे मतदानासाठी नेंदणी केलेल्या नागरिकांच्या घरोघरी जाऊन मतदान घेण्यात आले.
पोस्टल बॅलेटद्वारा मतदान घेण्यासाठी निवडणूक विभागाने शहरात प्रिसायडिंग ऑफिसर, पोलींग एजंट, बीएलओ व इतर अधिकाऱयांची नियुक्ती केली होती. त्याचबरोबर मतदान प्रक्रियेचे चित्रिकरण करण्यासाठी व्हीडिओग्राफरची नियुक्ती करण्यात आली होती. अधिकाऱयांच्या उपस्थितीत मतदानाची नोंद करून घेण्यात आली.
पोस्टल बॅलेटद्वारा मतदान करण्यासाठी नोंदणी केलेल्या नागरिकांच्या घरी गेल्यानंतर एका वेगळय़ा खोलीत मतदानाकरिता आवश्यक ती जुळणी करण्यात आली. याकरिता आडोसा निर्माण करण्याबरोबरच सर्व अधिकारी व व्हिडीओग्राफर उपस्थित होते. मतदारांकडे मतपत्रिका सोपवून मतदान करण्याबरोबरच मतदानपत्र लिफाफ्यामध्ये बंद करून त्यावर सील लावण्याची सूचना करण्यात आली होती. बंद असलेला लिफाफा मतदान पेटीमध्ये टाकल्यानंतर दुसऱया मतदारांकडे जाऊन मतदानाची नोंद करून घेण्यात आली.
सायंकाळी 6 पर्यंत विविध ठिकाणी पोस्टल मतदान करून घेण्यात आले. सायंकाळी टेझरी कार्यालयातील स्ट्राँगरूममध्ये मतपेटय़ा जमा करण्यात आल्या. या प्रक्रियेचे चित्रिकरण करण्यात आले आहे. वृद्धांना घरबसल्या मतदान करण्याची मुभा पहिल्यांदाच उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे विविध नागरिकांनी याचा लाभ घेतला.
दबावाच्या प्रयत्नाबाबत आक्षेप
ही प्रक्रिया सुरू असताना ठरावीक उमेदवारालाच मतदान करण्यासाठी वृद्ध नागरिकांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न काही ठिकाणी झाला. त्यामुळे याबाबत आक्षेप घेतण्यात आला. परिणामी काही नागरिकांनी पोस्टल बॅलेटद्वारा मतदान करणे नाकारून मतदान केंद्रावर जाऊन मतदान करण्याची इच्छा व्यक्त केली.