वैद्यकीय पथक लक्ष ठेवून – आश्रम सॅनिटायझेशनच्या कामाला प्रारंभ
प्रतिनिधी/ सातारा
कोरोना संसर्गाने सध्या पुन्हा वर तोंड काढले आहे. यामध्ये महागाव (ता. सातारा) येथील मातोश्री वृध्दाश्रमातील 19 जण बाधित समोर आलेत. मात्र, यापैकी लक्षणे असलेल्या 10 वृध्द रुग्णांना उपचारासाठी जम्बो कोव्हिड व सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या सर्वांची प्रकृती स्थिर असून उर्वरित तीव्र लक्षणे नसलेल्या 9 रुग्णांना आश्रमात क्वारंटाईन करण्यात आले असल्याची माहिती चिंचणेर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी श्रीकांत कारखानीस यांनी दिली.
वास्तविकता महागाव येथील मातोश्री वृध्दाश्रम हा लोकवस्तीपासून दूर तिथे 28 जण वृध्द रहात असून तिथे त्यांचे संगोपन केले जाते. यापैकी सध्या 19 बाधित समोर आले आहेत. मात्र, त्यांची प्रकृती स्थिर आहे. काही दिवसांपूर्वी संस्थापक तपासणी करण्यात आली त्यावेळी आरोग्य विभागाला याच आश्रमात चार वृध्द बाधित आढळून आले होते. मात्र, त्यांना तिथेच क्वारंटाईन करुन उपचारानंतर ते कोरोनामुक्त झाले आहेत.
त्यानंतर दोन दिवसांपूर्वी काही कालावधीनंतर जी तपासणी करावयाची असते त्यात 19 बाधित समोर आले. मात्र त्यापैकी 9 जणांना फारशी लक्षणे नाहीत. तीव्र लक्षणे असलेल्यांना आरोग्य विभागाने जम्बो कोव्हिड हॉस्पिटल व जिल्हा रुग्णालयात उपचारास दाखल केले असून ते देखील कव्हर होतील, असा विश्वास डॉ. कारखानीस यांनी व्यक्त केला आहे.
चिंचणेर वंदन प्राथमिक आरोग्य केंद्राचे पथक घडामोडींवर लक्ष ठेवून असून महागाव ग्रामपंचायतीने आश्रमाच्या सॅनिटायझरच्या कामाला प्रारंभ केला असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी श्रीकांत कारखानीस यांनी दिली. मातोश्री वृद्धाश्रमातील वृद्ध नागरिकांपैकी चार नागरिकांना कोरोनाची बाधा झाली होती. उपचारानंतर ते आता पूर्णपणे बरे झाले असले तरी त्यांच्या संपर्कात आलेल्या अन्य 19 वृद्ध नागरिकांना कोरोनाची बाधा झाली असल्याचे त्यांच्या अहवालावरून मंगळवारी सायंकाळी स्पष्ट झाले आहे.
वैद्यकीय पथकाने त्यापैकी पाचजणांना काल रात्री तर बुधवारी सकाळी पाच जणांना अशा एकूण दहा जणांना उपचारासाठी सातारा येथील जिल्हा रुग्णालयात हलवले आहे. आश्रमातील सर्वांचे समुपदेशन करुन या स्थिती काय काळजी घ्यावयाची तसेच लक्षणे आढळल्यास तातडीने तपासणी करुन घेण्याबाबत माहिती देण्यात आलीय.
आश्रमाचे सॅनिटायझरेशन केले
चिंचणेर वंदन प्राथमिक आरोग्य केंद्राचे पथक आश्रमातील परिस्थितीवर लक्ष ठेवून असून दररोज मातोश्री आश्रम येथे जाऊन एक पथक रुग्णांची ऑक्सिजन पातळी तपासण्यासह त्यांना आवश्यक ती औषधे दिली जात आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून महागाव ग्रामपंचायतीने आश्रमाच्या सॅनिटायझरचे काम हाती घेतले असल्याची माहिती डॉ. श्रीकांत कारखानीस यांनी दिली असून वेळेतच निदान व उपचार झाल्याने हे रुग्ण बरे होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.