भिक्षुकांना टार्गेट करणाऱया सिरीयल किलरची चौकशी : हुबळी येथेही दोन भिक्षुकांचा केला खून
प्रतिनिधी /बेळगाव
गेल्या 9 महिन्यांपूर्वी अमाननगर परिसरात एका वृद्धेवर बलात्कार करून तिचा खून केल्याच्या आरोपावरून माळमारुती पोलिसांनी एका सिरीयल किलरला अटक केली आहे. त्याची कसून चौकशी करण्यात येत असून बेळगाव परिसरात त्याने सुमारे तीन खून केल्याचा संशय आहे.
रफीक उर्फ गिड्डारफीक मकबुल औरंगवाले (वय 48, रा. हुबळी) असे त्या विकृताचे नाव आहे. गिड्डारफीकने हुबळी येथे दोन भिक्षुकांचा खून केला आहे. याप्रकरणी 20 दिवसांपूर्वी हुबळी टाऊन पोलिसांनी त्याला अटक केली होती. त्याने बेळगाव परिसरातही खून केल्याची कबुली दिली होती.
माळमारुतीचे पोलीस उपनिरीक्षक होन्नाप्पा तळवार व त्यांच्या सहकाऱयांनी न्यायालयाची परवानगी घेऊन गिड्डारफीकला ताब्यात घेतले आहे. एका 70 वषीय वृद्धेवर बलात्कार करून दगडाने ठेचून तिचा खून केल्याची कबुली त्याने दिली असून सध्या त्याची कसून चौकशी करण्यात येत आहे.
6 जुलै 2021 रोजी अमाननगर परिसरातील शेतवडीत एका वृद्धेचा मृतदेह आढळून आला होता. दगडाने ठेचून तिचा खून करण्यात आल्याचे उघडकीस आले होते. यासंबंधी त्याचदिवशी माळमारुती पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आली होती. या वृद्धेवर अत्याचार झाल्याचे शवचिकित्सा अहवालावरून उघडकीस आले होते.
वृद्धेचा खून कोणी केला? याचा तपास करूनही गुन्हेगार पोलिसांच्या हाती लागला नव्हता. 20 दिवसांपूर्वी गिड्डारफीक हुबळी टाऊन पोलिसांच्या ताब्यात अडकला. त्याने दिलेल्या जबानीवरून त्याची विकृती सामोरी आली. त्याने बेळगाव परिसरातही खून केल्याचे उघडकीस आले. हुबळी पोलिसांनी बेळगाव पोलिसांना यासंबंधीची माहिती दिली. न्यायालयाची परवानगी घेऊन खूनप्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे.
100-200 रुपयांसाठी खून
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गिड्डारफीक भिक्षुकांना आपले लक्ष्य बनवितो. दगडाने ठेचून खून केल्यानंतर त्यांच्या खिशात सापडणारे 100 ते 200 रुपये घेऊन तो तेथून फरारी होतो. मुडदा भिक्षुकाचा पडला आहे म्हणून पोलीस दलही गांभीर्याने त्याचा तपास करत नाही. याचाच फायदा गिड्डारफीकला मिळत होता. हुबळी परिसरात झालेल्या दोघा भिक्षुकांच्या खुनानंतर पोलिसांनी गिड्डारफीकच्या मुसक्मया आवळल्या आहेत. बेळगाव परिसरात त्याने तीन खून केल्याचा संशय असून पोलीस त्याची कसून चौकशी करीत आहेत.