व्हॅक्सिन शब्दाचा वापर दुप्पट – अनेक नवे शब्द वापरात
वृत्तसंस्था/ लंडन
दोन वर्षांपासून कोरोनाने जगाला बदलून टाकले आहे. यामुळे याच्याशी संबंधित अनेक नवे शब्द वापरात आले आहेत. ऑक्सफोर्ड ‘वर्ड ऑफ द ईयर’साठी यंदा कोरोनाशी संबंधित शब्दांदरम्यान स्पर्धा होती. अखेर ‘जॅब’, ‘शॉट’ आणि ‘फौसी औसी’ (अमेरिकेच्या आरोग्य यंत्रणेच्या प्रमुखांचे नाव फौसी) यांना मागे टाकून व्हॅक्सिनचे संक्षिप्त स्वरुप ‘वॅक्स’ हा वर्ड ऑफ द ईयर ठरला आहे.
लसीसाठी वापरल्या जाणाऱया सर्व शब्दांचा वापर वाढला, पण वॅक्स हा छोटा, लक्ष वेधणारा शब्द आहे. नव्या शब्दांना निर्माण करण्यात सर्व प्रकारच्या रुपांमध्ये याचा वापर करण्यात आल्याचे ऑक्सफोर्ड लँग्वेजेसच्या सीनियर एडिटर फियोना मॅफर्सन यांनी सांगितले आहे.
मागील वर्षी कोरोना लसीकरण मोहीम विविध देशांमध्ये सुरु होताच व्हॅक्सिन शब्दाचा वापर दुपटीहून अधिक वाढला आहे. पण वॅक्सचा वापर मागील वर्षाच्या तुलनेत यंदा सप्टेंबरमध्ये 72 पटीने वाढला आहे. वर्ड ऑफ द ईयर ऑक्सफोर्डच्या सातत्याने अपडेट होत राहणाऱया 145 कोटी शब्दांच्या कोषमधील शब्दांच्या वापराच्या प्रमाणावर निवडला जातो.
इंग्रजी भाषिक देशांमध्ये वृत्तस्रोतांमधून वापराच्या पुराव्यांना एकत्र करण्यात येते. वॅक्सवरून वॅक्सी, वॅक्सिनिस्टा, वॅक्सिकेशन यासारखे शब्द देखील तयार झाले, पण त्यांचा वापर कमी होत गेल्याचे ऑक्सफोर्डकडून सांगण्यात आले.
व्हॅक्सिन हा इंग्रजीतील प्रचलित शब्द आहे. 1980 मध्ये पहिल्यांदा याकरता वॅक्सचा वापर झाला. ब्रिटिश वैज्ञानिक एडवर्ड जॅनर यांनी लसींचा प्रयोग केला. तर 1799 मध्ये पहिल्यांदा इंग्रजी भाषेत व्हॅक्सिन शब्दाची नोंद झाली.