वेंगुर्ले / वार्ताहर:
वेंगुर्ले मंगळवारी रात्रौ पडलेल्या मुसळधार पावसाने वेंगुर्ले शहरातील साईमंगल कार्यालयानजीचे अनिता अहमंद नाईक यांचे मातीचे घर कोसळले. अतिवृष्टीच्या पावसोन पडलेल्या या घराचे सुमारे 50 हजार रूपयांचे नुकसान झाले आहे. सदर घराची तात्पुरती डागडुजीकरून अन्य होणारी नुकसानी थांबविण्यासाठी माजी नगराध्यक्ष संदेश निकम, व्यावसायिक अंबरीश मांजरेकर व नगरसेवक सुमन निकम यांनी सहकार्य केले. या नैसर्गिक आपत्तीची नोंद वेंगुर्ले तहसिलदार कार्यालयात नैसर्गिक आपत्ती विभागाकडे झाली आहे.
गेली अनेक वर्षे या घरांत अनिता अहंमद नाईक यांचेसह चार व्यक्ती या घरांत रहात होत्या. मंगळवार दि. 7 सप्टेंबर रोजी रात्रीपासून मुसळधार पर्जन्यवृष्टी सुरू झाली. या पर्जन्यवृष्टीत हे घर रात्री कोसळले. या घरांत त्यावेळी कोणीही नव्हते. सध्या या घरांत रहात असलेले भाडोत्री श्री. धुरी हे आपल्या व्यवसायानिमीत्त सकाळ ते दुपारी पर्यत थांबतात. ते बुधवार दि. 8 सप्टेंबर रोजी सकाळी आल्यानंतर त्यांना घर कोसळलेले दिसले. त्यामुळे मालवण येथे कांही कामानिमीत्त रहात असलेल्या घराच्या मालकिण अनिता नाईक यांना त्यांनी तात्काळ कळविले. त्यानुसार त्यांनी या भागाचे नगरसेवक संदेश निकम व सुमन निकम यांना घराची वस्तुस्थिती पाहून नगरपरीषदेस व नैसर्गिक आपत्ती कक्षात कळविण्याचे तसेच घरातील अन्य नुकसान होऊ नये. संपूर्ण घर जमिनदोस्त होऊ या करीता तात्पुरती उपाय योजना करावी. अशी विनंती केली. त्याप्रमाणे नगरसेवक संदेश निकम यांनी नगरपरीषदेचे मुख्याधिकारी डॉ. अमितकुमार सोंडगे व तहसिलदार कार्यालयातील नैसर्गिक आपत्ती कक्ष व शहर तलाठी श्री. गोरड यांना कळविले. मुख्याधिकारी व शहर तलाठी यांनी या घराची प्रत्यक्ष पहाणी केली. शहर तलाठी यांनी नुकसान झालेल्या परीस्थितीचा पंचनामाही केला. त्यानुसार 3 भिती, घराचे 19 वासे व लागडी रिपा, घरातील कपडेलत्ते, गाद्या, बेडशीट, घराची कौले व कोने आणि सिलींग फॅन यांचे 45 हजार रूपयांचे नुकसान झाल्याचा पंचनामा केला आहे. या पंचनाम्यावेळी नगरसेविक संदेश निकम, अंबरीश मांजरेकर हे उपस्थित होते. पंचनाम्यानंतर संपूर्ण घर जमिन दोस्त होऊ नये. यासाठी माजी नगराध्यक्ष संदेश निकम व नगरसेविका सुमन निकम यांनी वासे, लाकडीरिपा, प्लॅस्टिकव ताडपत्री घालून सुमारे 8 हजार रूपये स्वखर्चाने डागडुजी केली.