यापुढे गाळेधारकांच्या पाठिशी राहाणार!
प्रतिनिधी / वेंगुर्ले:
वेंगुर्ले नगर परिषदेच्या शिवसेनेच्या उपनगराध्यक्षा अस्मिता राऊळ यांनी गुरुवारी आपल्या उपनगराध्यक्ष पदाचा तडफातडफी राजीनामा दिला आहे. नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेला निर्णय पालिका सत्ताधारी जुमानत नसल्याने हा राजीनामा देत असल्याचे त्यांनी नगराध्यक्ष यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. यापुढे आपण व्यापाऱयांच्या बाजूने ठामपणे उभी राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
वेंगुर्ले सागररत्न मत्स्य बाजारपेठ इमारतीतील मूळ गाळेधारकांवर वेंगुर्ले न. प. कडून अन्याय होत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. पत्रकारांशी बोलताना त्या म्हणाल्या की, आमदार दीपक केसरकर यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी 6 ऑगस्ट रोजी वेंगुर्ले नगराध्यक्ष, मुख्याधिकारी, आमदार केसरकर, व्यापारी संघाचे अध्यक्ष विवेक खानोलकर यांची ऑनलाईन बैठक घेतली होती. या बैठकीत शिंदे यांनी दिलेला निर्णय न. प. जुमानत नसल्याने आपण हा राजीनामा देत आहे.
गुरुवारी गाळेधारक व व्यापारी यांची बैठक झाली. या बैठकीत गाळेधारकांच्या बाजूने निर्णय होईल, अशी अपेक्षा होती. या बैठकीत शासनाने दिलेल्या निर्णयानुसार लिलाव प्रक्रिया करण्यात येईल. मात्र, लिलाव प्रक्रियेत गाळेधारकांना 30 वर्षे दीर्घ मुदत वाढ करुन देण्याबाबत शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात येईल, असे नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांनी सांगितले. गेली कित्येक वर्षे व्यवसाय करणाऱया येथील स्थानिक जुन्या गाळेधारकांवर अन्याय असल्याने आपण आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे, असे त्या म्हणाल्या.
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख यशवंत उर्फ बाळू परब, उपजिल्हा प्रमुख सुनील डुबळे, बाळा दळवी, शहर समन्वयक विवेक आरोलकर, जिल्हा कार्यकारिणी सदस्य सचिन वालावलकर, डेलिन डिसोजा, हेमंत मलबारी आदी उपस्थित होते.