नगराध्यक्ष मुख्याधिकारी यांची माहिती : खबरदारी घेण्याचे आवाहन
प्रतिनिधी / वेंगुर्ले:
वायंगणी येथे सापडलेल्या रुग्णाच्या प्रत्यक्ष संपर्कात आलेल्या 19 जणांचा कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे सोमवारपासून वेंगुर्ले शहरातील बहुतांश दुकाने सुरू करण्यात येणार असल्याची माहिती वेंगुर्ले नगराध्यक्ष दिलीप गिरप व मुख्याधिकारी वैभव साबळे यांनी दिली. रविवार 10 मेपासून हेअर कटिंग सलून, स्पा व ब्युटी पार्लर, बिअर आणि वाईन शॉप, चायनीज दुकाने, खाद्य पदार्थांच्या हातगाडय़ा, पान व तंबाखू विक्री करणाऱया टपऱया व दुकाने सोडून वेंगुर्ले शहरातील सर्व दुकाने सुरू करण्यात आली.
वेंगुर्ल्यातील नागरिकांनी व व्यापारी बंधू-भगिनींनी प्रशासनाला पूर्ण सहकार्य करून कोरोना विरुद्धच्या लढय़ात आत्तापर्यंत बहुमोल योगदान दिले आहे. ते यापुढील काळातही आवश्यक आहे. त्यामुळे दुकाने सुरू करण्याची परवानगी देण्यात आलेल्या व्यापारी बंधू-भगिनींनी स्वतःची काळजी घेण्यासाठी पुढील बाबींचे काटेकोर पालन करावे.
1. दुकानदार, ग्राहकांनी मास्क परिधान करावा. 2. सर्व व्यापाऱयांनी स्वतःसाठी व ग्राहकांसाठी हॅण्डवॉश सेंटर उपलब्ध करावे. 3.दुकानाबाहेर सोशल डिस्टन्सिंगच्या खुणांबाबत कटाक्षाने काळजी घ्यावी. 4. सायंकाळी 7 वाजल्यानंतर बाहेर फिरण्याची अनुमती नाही. 5. खाद्यपदार्थांची पार्सल सुविधा केवळ दुपारी 1 पर्यंत सुरू राहील, रात्रीच्या वेळेस केवळ घरपोच सेवा. 6. मेडिकल चालकांनी योग्य व नजीकच्या काळातील प्रिस्क्रीप्शनशिवाय कोणालाही औषधे देऊ नयेत. 7. दुकानासमोर गर्दीचे नियंत्रण ठेवण्यासाठी व्यापाऱयांनी दुकानाबाहेर एक कर्मचारी नेमावा, जास्तीत जास्त प्रमाणात घरपोच सेवेचा लाभ नागरिकांनी घ्यावा. 8. नगरपरिषदकडून प्राप्त पासशिवाय फिरणाऱया दुचाकी व अन्य वाहन चालकांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात येईल.
वरील निर्देशांचे उल्लंघन झाल्यास कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. असे आवाहन नगराध्यक्ष दिलीप गिरप, उपनगराध्यक्षा अस्मिता राऊळ, सर्व नगरसेवक व मुख्याधिकारी वैभव साबळे यांनी केले आहे.