वेंगुर्लेवासीयांची जिल्हाधिकाऱयांकडे मागणी : कोरोनाग्रस्तांवर उपायायोजन करण्यासाठी मध्यवर्ती ठिकाण!
प्रतिनिधी / वेंगुर्ले:
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 व आपत्कालीन व्यवस्थापन कायदा 2005 मधील तरतूदीनुसार वेंगुर्ले शहरातील बंद असलेले सेंट लुक्स हॉस्पिटल शासनाने ताब्यात घ्यावे, अशी मागणी वेंगुर्लेवासीयांतर्फे माजी नगराध्यक्ष सुनील डुबळे यांनी जिल्हाधिकाऱयाकडे केली आहे.
महाराष्ट्र शासनाने कोरोना विषाणूने उद्भवणाऱया संसर्गजन्य रोगाचा प्रतिबंध व नियंत्रणासाठी महाराष्ट्र कोव्हिड 19 उपाययोजना नियम 2020 आणि आपत्कालीन व्यवस्थापन कायदा 2005 मधील तरतुदीनुसार जिल्हय़ासाठी जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांना सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित केले आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी यांनी कोरोनावर नियंत्रण व प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्या कारणासाठी सिंधुदुर्ग जिल्हय़ात येणाऱया तालुक्यातील आवश्यक ती सर्व सरकारी, खाजगी, संस्था संचलित हॉस्पिटल्स, हॉल, खोल्या, ग्राऊंड, हॉटेल व अन्य आवश्यक असणारी जागावरील कायद्यातील तरतुदीनुसार प्राप्त झालेल्या अधिकाराने अधिग्रहीत करण्याचे अधिकार जिल्हाधिकारी यांना मिळाले आहेत.
गेल्या वीस वर्षांपासून रुग्णालय बंद!
वेंगुर्ले तालुक्यात फक्त एकच नगर परिषद सरकारी हॉस्पिटल व छोटी उप आरोग्य केंद्र आहेत. संपूर्ण तालुक्यातील लोकसंख्या पाहता उपलब्ध असलेले हॉस्पिटल आणि उपआरोग्य केंद्र आणि त्यातील अपुऱया वैद्यकीय सोयी कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यामध्ये तुटपुज्या ठरणार आहेत. तालुक्याच्या मध्यवर्ती ठिकाणी सेंट लुक्स हॉस्पिटल हे मिशनरी, ख्रिश्चन संस्थेला चालविण्यासाठी ब्रिटीश काळात देण्यात आले होते. सेंट लुक्स हॉस्पिटल चालविणाऱया मिशनरी संस्थेच्या आर्थिक व अन्य अडचणीमुळे सदर हॉस्पिटल गेली 15-20 वर्षांपासून बंद आहे.
रुग्णालय सुरू झाल्यास गैरसोय टळणार!
या हॉस्पिटलमध्ये खाजगी संस्थेतर्फे, व्यक्तीतर्फे आय. सी. यु. व्हेंटीलेटर, रुग्णवाहिकासारख्या सोयी उपलब्ध करुन देण्यात आल्या होत्या. परंतु हॉस्पिटल बंद असल्याने त्याचा स्थानिक जनतेला काहीही उपयोग होत नाही. हे हॉस्पिटल सुरू करण्यासाठी वेंगुर्ल्यातील जनतेने खूप प्रयत्न केले. परंतु सदर संस्था हॉस्पिटल स्वतः चालवित नाही अथवा खाजगी लोकांनाही चालवू देत नाही. यामुळे वैद्यकीय सोयीची कमतरता असल्याने वेंगुर्ल्यातील व आजुबाजुच्या तालुक्यातील रुग्णांना नाईलाजाने गोवा येथे खाजगी किंवा सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागते. त्यामुळे रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.
क्वारंटाईटनसाठी उपयोग होऊ शकतो
या संस्थेची फळ संशोधन केंद्र वेंगुर्ले कॅम्पजवळ खूप मोठी जागा आहे. त्या जागेचा वापर पूर्वी टी. बी. पेशंट ठेवण्यासाठी तसेच अनाथाश्रम चालविण्यासाठी केला जात होता. आता ती जागा सुद्धा गेली 30-35 वर्षे विनावापर पडून आहे. सेंट लुक्स हॉस्पिटल व फळ संशोधन केंद्राजवळची जागा जर सध्याच्या कोरोनाच्या आपत्तीमध्ये सरकारने ताब्यात घेतली व हॉस्पिटल इमारतीमध्ये तात्पुरती डागडुजी केली तर कोरोनाग्रस्तांवर उपचार तसेच क्वारंटाईनसाठी वापरता येईल.
शासनाने सदर रुग्णालय ताब्यात घ्यावे, अशी मागणी माजी नगराध्यक्ष सुनील डुबळे, तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष विवेक खानोलकर, नागरी कृती समिती उपाध्यक्ष भाई मोर्जे व खर्डेकर कॉलेजचे प्राचार्य विलास देऊलकर यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. सदर निवेदनाच्या प्रति मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्री, पालकमंत्री, आरोग्यमंत्री, खासदार, आमदार, यांना पाठविण्यात आल्या आहेत.