एसटी गाडय़ांमधून सिंधुदुर्ग रेल्वेस्थानकावर रवाना
वार्ताहर / वेंगुर्ले:
लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर परगावातील येथे अडकलेल्या व्यक्ती व मजुरांसाठी त्यांच्या गावी जाण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. त्यानुसार वेंगुर्ले तहसीलदारांकडे ऑनलाईन नोंद झालेल्या कर्नाटकातील धारवाड, कोपल, बेल्लरी व यादगीर या भागातील सुमारे 300 मजुरांना त्यांच्या गावी रेल्वेने जाण्याचे नियोजन सावंतवाडीचे प्रांताधिकारी सुशांत खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वेंगुर्ले तहसीलदार प्रवीण लोकरे यांनी केले. त्यानुसार शनिवारी वेंगुर्ले आगाराच्या 15 एसटी गाडय़ांमधून हे सर्व प्रवासी सिंधुदुर्ग रेल्वेस्थानकावर मार्गस्थ झाले. तत्पूर्वी या सर्वांची तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ. अश्विनी माईणकर-सामंत यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने आरोग्य तपासणी केली.
लॉकडाऊन काळात वेंगुर्ले तालुक्मयात बरेच परप्रांतीय तसेच मजूर अडकले होते. त्यांना आपल्या गावी पाठविण्यासाठी नियोजन करण्याचे आदेश सरकारने दिले होते. त्याप्रमाणे एसटीच्या 15 गाडय़ांतून प्रत्येक बसमध्ये वीस प्रवासी याप्रमाणे तालुक्यातील सदरचे प्रवासी सकाळी सिंधुदुर्ग रेल्वेस्थानकावर मार्गस्थ झाले. तत्पूर्वी एस. टी. गाडय़ा स्वच्छ धुऊन सॅनिटायझर तसेच जंतुनाशक यांची फवारणी करून घेण्यात आल्या. प्रत्येक चालकास सॅनिटायझर, मास्क पुरविण्यात आले. या कामासाठी एस. टी. प्रशासनाचे सहा सुपरवायझर, पाच कार्यशाळा टेक्निशियन, 20 चालक यांना कामावर बोलावण्यात आले. या गाडय़ांसोबत नोडल अधिकारी म्हणून तलाठी उपस्थित होते. पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता. ही माहिती माहिती वेंगुर्ले आगार व्यवस्थापक जी. एस. चव्हाण यांनी दिली.
वेंगुर्ले तहसीलदारांच्या नियोजनानुसार तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्विनी माईणकर-सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. सई लिंगवत, टेक्निशियन ओगल यांच्यासह वैद्यकिय पथकाने सर्वांची आरोग्य तपासणी केली. मजुरांसाठी हा प्रवास मोफत होता. या मजूर व परप्रांतीयांच्या प्रवासाची रक्कम शासनाकडून एस. टी. विभागाला देण्यात येणार असल्याचे वेंगुर्ले आगार व्यवस्थापक जी. एस. चव्हाण यांनी स्पष्ट केले.