सिंधुदुर्गसह रत्नागिरी, गोवा, कर्नाटकातील शेतकऱयांसाठी ठरणार वरदान : लवकरच लोकार्पण!
के. जी. गावडे / वेंगुर्ले:
वेंगुर्ले प्रादेशिक फळ संशोधन केंद्रात महाराष्ट्र शासनाच्या ‘चांदा ते बांदा’ योजनेमधून सुमारे 64 लाख रुपये खर्चाचे कृषी तंत्रज्ञान व माहिती केंद्र साकारत आहे. दापोलीनंतर कोकणातील हे दुसरे अद्ययावत असे कृषी तंत्रज्ञान व माहिती केंद्र आहे. हे केंद्र सिंधुदुर्ग जिल्हय़ाबरोबरच गोवा, कर्नाटक आणि रत्नागिरी जिल्हय़ातील शेतकऱयांसाठी वरदान ठरणार आहे.
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली हे कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे आणि पालघर या पाच जिल्हय़ांसाठी कृषी तंत्रज्ञान निर्मिती करणारे विद्यापीठ आहे. हे कृषी विद्यापीठ कोकणातील सर्व मुख्य पिकांसंबंधी संशोधन करते. विकसित झालेले तंत्रज्ञान कृषी विभागामार्फत शेतकऱयांपर्यंत पोहोचविते. कृषी विद्यापीठाचे काम हे कृषी शिक्षण, कृषी संशोधन आणि काही प्रमाणात कृषी विस्ताराचे आहे.
विद्यापीठाने विकसित केलेले संशोधन शेतकऱयांना विविध माध्यमातून पाहता यावे, म्हणून कृषी विद्यापीठाने दापोली येथे मुख्यालयात कृषी तंत्रज्ञान व माहिती केंद्र स्थापन केले आहे. या केंद्राला आजपर्यंत लाखों शेतकऱयांनी भेटी दिल्या असून विद्यापीठाचे तंत्रज्ञान आपल्या शेतावर राबविण्यासाठी त्याचा फार मोठा उपयेग झाला आहे. कृषी, कृषी अभियांत्रिकी, उद्यानविद्या, वनशेती, मत्स्यशेती आदी शाखांनी निर्माण केलेले तंत्रज्ञान तेथे मांडण्यात आले आहे. अशाच प्रकारचे कृषी व माहिती तंत्रज्ञान केंद्र जिल्हय़ात असावे, असा मानस ठेवून विद्यापीठाने प्रादेशिक फळ संशोधन केंद्र वेंगुर्ले येथे दापोलीसारखेच अद्ययावत माहिती केंद्र महाराष्ट्र शासनाच्या ‘चांदा ते बांदा’ या योजनेमधून सुरु करण्यात येणार आहे. यासाठी तत्कालीन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी प्रयत्न केले. तर विद्यमान पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते या कृषी तंत्रज्ञान व माहिती केंद्राचे भूमिपूजन करण्यात आले.
या कृषी तंत्रज्ञान व माहिती केंद्राच्या इमारतीचे काम पूर्ण झाले आहे. हे केंद्र सिंधुदुर्ग जिल्हय़ाबरोबरच गोवा, कर्नाटक आणि रत्नागिरी जिल्हय़ातील शेतकऱयांसाठी लाभदायक ठरणार आहे. या केंद्रामध्ये भात नाचणी, कुळीथ आदी पिकांच्या लागवड पद्धती, आंबा, काजू आदी फळ पिकांच्या लागवड पद्धती, वन पिकांची माहिती, तसेच अन्यही कृषीविषयक माहिती आकर्षक पद्धतीने मांडण्यात येणार आहे. विद्यापीठाने निर्माण केलेली यंत्रे, बी बीयाणे, अवजारे, पुस्तके, प्रक्रीयायुक्त पदार्थ आदी वस्तू या केंद्रावर उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे कृषीविषयक विविध प्रशिक्षणाचा लाभ शेतकऱयांना या केंद्रात घेता येणार आहे. या केंद्राच्या इमारतीचे काम पूर्ण झाले आहे. मात्र, संशोधनाच्या वेगवेगळय़ा प्रतिकृती, विविध पिके, फळे यांची माहिती देणारे चार्ट आदी येत्या एक महिन्यात करण्यात येणार आहे. त्यानंतर या केंद्राचे उद्घाटन करण्यात येणार अशी माहिती वेंगुर्ले प्रादेशिक फळ संशोधन केंद्राचे सहयोगी संचालक डॉ. बी. एन. सावंत व डॉ. विजयकुमार देसाई यांनी दिली.