वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
मागील काही दिवसांपासून आठ ते दहा तासांचा कालावधी मोबाईल चार्जिंगसाठी लागत होता, परंतु तो कालावधी सध्या काही प्रमाणात कमी होत असून विविध मोबाईल कंपन्या मजबूत बॅटरीची क्षमता देत आहेत. फास्ट चार्जिंगचे चार्जर येत असल्याचे चित्र सध्या बाजारात दिसत आहे.
चिनी स्मार्टफोन कंपनी शाओमीने आपल्या 11 टी आवृत्तीचे दोन स्मार्टफोन सादर केले आहेत. 11 टी आणि 11 टी प्रो या मॉडेलचा समावेश आहे. प्रथमच कंपनीने आपल्या स्मार्टफोन आवृत्तीत 120 वॉट हायपर चार्जर आणला आहे. या चार्जरच्या मदतीने 5000 एमएएच क्षमतेची दमदार बॅटरी कमी कालावधीत म्हणजेच अगदी 17 मिनिटात 100 टक्के चार्ज होणार असल्याचा दावा कंपनीने केला आहे.
शाओमीसह, वनप्लस, रियलमी, रियलमी, सॅमसंग, विवोसह अन्य कंपन्याही आपल्या ग्राहकांना दीर्घ क्षमतेची बॅटरी देण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. येत्या काळात अधिक काळ व कमी कालावधीत 100 टक्के बॅटरी चार्जिंग करण्याची सुविधा देण्यावर भर देणार असल्याचे काही अभ्यासकांचे मत आहे.
1983 मध्ये सर्वात प्रथम पोर्टेबल फोन मोटोरोला डायना टीएसी 8000एक्स बॅटरी 1 तासाच्या टॉकटाईमसह बॅटरी चार्जिंग सुविधा 8 तासांमध्ये करता येण्याची सुविधा देण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हापासून आतापर्यंत चार्जिंग टेक्नॉलॉजी वेगाने बदलत गेली आहे.