प्रतिनिधी/ सातारा
सातारा जिह्यातील गेल्या पाच दिवसापासून बाधित आढळून येण्याचा वेग मंदावत आहे. जिह्यातील 1394 बाधित आढळून आले तर त्याच्या दुप्पट शनिवारी 2923 कोरोना मुक्त झाल्याने जिल्हावासीयांना काहीसा दिलासा मिळू लागला आहे. त्यातच गावोगावी आयसोलेशन सेंटरमध्ये उपचार घेत असलेले रुग्ण खडखडीत बरे होऊन घरी जाऊ लागले आहेत. बिदाल, गोंदवले येथील कोरोनामुक्तीचा पॅटर्नचा बोलबाला सुरू झाला आहे. दरम्यान, आकडे अपलोड घोटाळा बाहेर काढून ‘तरुण भारत’ने प्रशासनावर चांगला ताडय़ा लगावल्याने जिल्हावासीयांमधून कौतुक होत आहे.
जिह्यातील गावोगावी आयसोलेशन केंद्र उभी राहिली आहेत. तेथे उपचार घेत असलेले कोरोना बाधित चांगला प्रतिसाद देऊन बरे होत आहेत. त्यातच गेल्या पाच दिवसापासून जिह्यातील बाधित होण्याचे प्रमाण कमी कमी होताना दिसत आहे. तपासणी जरी वाढल्या असल्या तरी पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाण कमी होत असून शनिवारी सकाळी जाहीर झालेला आकडा हा दिलासादायक होता. 1394 जण बाधित आढळून आले तर त्याच्या दुप्पट प्रमाणात कोरोनाचा विळख्यात बरे होऊन घरी आलेल्यांची संख्या 2923 एवढी आहे. बाधित होण्याचे प्रमाण कमी होऊ लागले आहे.हाच जिल्हावासीयांना दिलासा आहे.
1394 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 27 बाधितांचा मृत्यू
सातारा जिह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 1394 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 27 बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.
तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आजअखेर बाधित रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढीलप्रमाणे. जावली 92(7862), कराड 252 (23285), खंडाळा 157 (10859), खटाव 74 (16709), कोरेगांव 116 (14982), माण 43 (11856), महाबळेश्वर 3 (4102), पाटण 56 (7247), फलटण 212 (27072), सातारा 294 (36524), वाई 81 (11879) व इतर 14 (1102) असे आज अखेर एकूण 173479 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.
तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या तर आज अखेर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 4 (175), कराड 5 (669), खंडाळा 1 (139), खटाव 3 (428), कोरेगांव 3 (331), माण 0 (225), महाबळेश्वर 0 (44), पाटण 1 (161), फलटण 2 (260), सातारा 6 (1085), वाई 2 (311) व इतर 0, असे आज अखेर जिह्यामध्ये एकूण 3828 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.
2923 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज
सातारा जिह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 2923 नागरिकांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
सातारा शहरातील आयसोलेशन सेन्टरमधून 100 जण झाले बरे
सातारा शहरात नगरसेवक बाळासाहेब खंदारे यांनी सुरू केलेल्या आयसोलेशन सेन्टरमधून आजपर्यन्त 100 जण कोरोनामुक्त झाले. त्याबद्दल नगरसेवक बाळासाहेब खंदारे यांनी कोरोनावर मात केल्याचा साधेपणाने सत्कार केला. तर नगरसेवक विजय काटवटे यांच्या ही आयसोलेशन सेन्टरमधून दहा जण बरे होऊन घरी गेले.