नवज्योत सिंग सिद्धूंना मिळतेय समर्थन : पंजाब काँग्रेसमध्ये दुफळी
वृत्तसंस्था /अमृतसर
पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग अणि नवनियुक्त पंजाब काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांच्यातील राजकीय संघर्ष अद्याप सुरूच आहे. अमरिंदर यांचा गट आता वेट अँड वॉचच्या धोरणानुसार पावले टाकत आहे. सोशल मीडियावर आपल्याविरोधात करण्यात आलेल्या अपमानास्पद टिप्पणींप्रकरणी सिद्धू जोपर्यंत जाहीर माफी मागत नाही तोवर मुख्यमंत्री त्यांना भेटणार नसल्याचे सांगण्यात आले आहे. तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माफी मागणार नसल्याचे सिद्धू यांच्या गटातील एका आमदाराने म्हटले आहे.
पक्षाध्यक्षा सोनिया गांधी या मुख्यमंत्र्यांशी बोलतील, त्याच प्रदेशाध्यक्ष म्हणून सिद्धू यांना नियुक्त करणार आहेत. या नियुक्तीला स्वीकार करणार नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हणायला हवे होते. पक्षाच्या शिस्तीचे पालन कोण करतेय हे पक्षशेष्ठी पाहणार असल्याचे या आमदाराने सांगितले आहे. तर सिद्धू आणि 4 अन्य कार्यकारी अध्यक्ष शुक्रवारी स्वतःचा पदभार स्वीकारणार आहेत. यानिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांना आमंत्रित केले आहे. पण अमरिंदर सिंग येतील का नाही हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
राहुल गांधी स्वतः मुख्यमंत्र्यांना सोबत नेणार नाहीत तोवर मुख्यमंत्री सोहळय़ात सामील होणार नाहीत, असे कॅप्टनच्या गटातील नेत्याने म्हटले आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्षाचा पदभार स्वीकारण्याच्या कार्यक्रमाकरता राहुल गांधी यांना यावे लागण्याची स्थिती काँग्रेसमध्ये ओढवली आहे का असा प्रश्नही या नेत्याने उपस्थित केला आहे.
निमंत्रण नसल्याचा दावा
मुख्यमंत्र्यांना पदभार ग्रहण सोहळय़ात भाग घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांना निमंत्रण पाठविल्याचा दावा सिद्धू गटाने केला आहे. तर मुख्यमंत्र्यांच्या गटाने कुठलेच निमंत्रण मिळाले नसल्याचे म्हटले आहे. मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्या तीव्र विरोधानंतरही काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी रविवारी सिद्धू यांची प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्ती केली होती. याचबरोबर आगामी विधानसभा निवडणुकीत सिद्धू यांच्या सहाय्यासाठी 4 कार्यकारी अध्यक्ष म्हणून संगत सिंग गिलजियां, सुखविंदर सिंग डॅनी, पवन गोयल, कुलजीत सिंग नागरा यांचीही नियुक्ती करण्यात आली होती.