प्रतिनिधी / वास्को
गोवा बंदर व गोदी कामगार संघटनेच्या पदाधिकाऱयांनी काल बुधवारी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची भेट घेऊन त्यांच्याकडे बंदरातील कामगारांच्या वेतन थकबाकीचा प्रश्न सोडविण्याची मागणी केली. संघटनेतर्फे यापूर्वी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांची भेट घेऊन त्यांच्याकडे तसेच राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर तसेच नगरविकासमंत्री मिलिंद नाईक यांची भेट घेऊन थकबाकीच्या प्रश्नावर त्यांना निवेदन सादर केले होते. मुरगाव बंदरातील एमपीटीच्या कामगारांची व त्यांच्या निवृत्ती वेतनधारकांची वेतन थकबाकी मागच्या तीन वर्षांपासून मिळालेली नाही. त्यामुळे त्यांनी या प्रश्नात लक्ष घालावे यासाठी राजकीय नेत्यांना साकडे घालणे सुरू केलेले आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कामगारांच्या वेतन थकबाकीच्या प्रश्नात लक्ष घालण्याचे आश्वासन संघटनेच्या पदाधिकाऱयांना दिले आहे. गोवा बंदर व गोदी कामगार संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मीकांत गावडे यांनी व त्यांच्या पदाधिकाऱयांनी नगरविकासमंत्री मिलिंद नाईक यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना निवेदन सादर केले.