दोडामार्ग – वार्ताहर-
वझरे येथील वेदांत कंपनीतर्फे नवदुर्गा हायस्कूल आयी व माध्यमिक विद्यालय माटणे या प्रशालेतील 35 विद्यार्थिनींना सायकलचे वाटप करण्यात आले. तसेच माटणे हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांना स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी यासाठी एक वॉटर प्युरिफायरही भेट म्हणून देण्यात आला. कंपनीच्या सामाजिक उपक्रमाचा एक भाग म्हणून या वस्तू देण्यात आल्याचे कंपनीतर्फे सांगण्यात आले.
वझरे परिसरातील विद्यार्थिनींना वाहतूक सुविधा अभावी अनेक गैरसोयींचा सामना करावा लागतो. रोज प्रशालेत जाण्यासाठी या विद्यार्थिनींना पायपीट करावी लागते ही गरज लक्षात घेऊन वेदांत कंपनीने सायकलींचे वाटप केले. तसेच यापुढेही आपल्या कार्यक्षेत्रा जवळील शैक्षणिक संस्थांना मदत देण्यासाठी विविध उपक्रम हाती घेत आहोत असेही कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
यावेळी कसई – दोडामार्ग शिक्षण संस्थेचे संस्थापक भाई परमेकर, आयी सरपंच साजु नाईक, माटणे सरपंच किशोरी डिचोलकर, आंबडगाव सरपंच सेजल गवस, वझरे सरपंच लक्ष्मण गवस, आयी व माटणे हायस्कूलचे मुख्याध्यापक, शिक्षक वर्ग, वेदांत कंपनीचे अधिकारी उमेश खाडे, मिलिंद बांदेकर, आशिष पिळणकर व आदिती वर्मा व वझरे पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते.