प्रतिनिधी / लांजा
मुंबई-गोवा महामार्गावरील वेरळ घाटात दोन महाकाय कंटेनर अडकून पडल्याने महामार्गावरील वाहतूक अर्धा तास ठप्प पडली होती. स्थानिक नागरिक व वाहनचालक यांच्या मदतीने कंटेनर बाजूला हटविण्यात आला. हि घटना शनिवारी सकाळी ११ च्या सुमारास घडली.
लांजा तालुक्यातील वेरळ घाट वाहनचालकांसाठी डेंजर झोन समजला जातो. वेरळ घाटात कंटेनर अडकण्याची चार वेळा घटना घडली आहे. दरम्यान वेरळ घाटातील तीव्र उतारावर मुंबईच्या दिशेने जाणारा कंटेनर बंद पडलेल्या अवस्थेवर उभा होता. याच दरम्यान गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या महाकाय कंटेनरने उभ्या असलेल्या कंटेनरला मागच्या बाजूने धडक दिली. यामध्ये कंटेनर महामार्गाच्या मध्यभागी अडकून पडला होता. अर्धातास कंटेनर बाजूला करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात होते. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूककोंडी झाली होती. अखेर स्थानिक नागरिक व इतर वाहनांचे चालक यांच्या मदतीने अर्ध्यातासानंतर अडकलेला कंटेनर बाजूला करण्यात आला. अर्ध्यातासानंतर वाहतूक सुरळीत झाली.