प्रतिनिधी / वास्को
मडगाव वेर्णा रस्त्यावर एक वृक्ष कारवर कोसळल्याने कारचालकाचा त्याच कारमध्ये चिरडून मृत्यू होण्याची घटना मंगळवारी सकाळी घडली. मयत कारचालक मडगावचे राहणारे असून सुनिल नाईक(43) असे त्यांचे नाव आहे. ते वेर्णातील एका कंपनीचे अधिकारी आहेत.
मडगाव वेर्णा मार्गावरील सॅनावली या भागात ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार मयत सुनिल नाईक हे मडगावहून वेर्णातील येथील टुलीप कंपनीत कामावर हजर होण्यासाठी वेर्णा औद्योगिक वसाहतीच्या दिशेने वेर्णातील जुन्या रस्त्यावरून येत होते. यावेळी एक वृक्ष कोसळणार असल्याची चाहुल लागल्याने काही लोकांनी रस्त्यावरील वाहनांना थांबवले होते. मात्र, मयत चालकांना या धोक्याच्या ईशाऱयाची कल्पना आली नाही. तो थोडा पुढे गेला असता एक जंगली वृक्ष त्यांच्या धावत्या आल्टो कारवर(जीए 08 ई 3691) कोसळला. सुनिल नाईक हे कारमध्ये एकटेच होते. वृक्ष कारवर कोसळताच ते कारमध्येच चिरडले गेले. अग्नीशामक दलाला या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी हजर होऊन मयत नाईक यांना बऱयाच कष्टाने कारमधून बाहेर काढले. मात्र, तोपर्यंत त्यांना मृत्यू आला होता. कारचीही या अपघातात पूर्ण वाताहात झाली.
मयत सुनिल नाईक हे मुळ कारवारचे मात्र, त्यांचे वास्तव्य मडगावात होते. ते वेर्णाच्या टुलीप कंपनीत व्यवस्थापक म्हणून कार्यरत होते. मडगाव पोलिसांनी या अपघाताचा पंचनामा केला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.