प्रतिनिधी / मडगाव :
संस्कार भारती गोवा प्रांतची वेर्णा शाखा व वेर्णा येथील श्री महालसा नारायणी देवस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केल्या जाणाऱया मासिक संगीत सभेच्या अंतर्गत ‘स्वरधारा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यक्रम रविवार 26 रोजी संध्याकाळी 4 वा. होणार असून त्यात अंबर मिरिंगकर व प्राची जठार या कलाकारांकडून शास्त्रीय व उपशास्त्रीय गायन सादर केले जाईल.
अंबर मिरिंगकर हे पुण्यातील भारती विद्यापीठातून संगीतात विशेष श्रेणीसह एमए झालेले असून पंडित विजय कोपरकर, पुणे यांच्याकडे संगीताचे अध्ययन करत आहेत. याशिवाय त्यांच्याकडून चार्टर्ड अकाउन्टंट अभ्यासक्रमाचे अंतिम वर्षाचे शिक्षण घेण्यात येत आहे. प्राची जठार या कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातून संगीत विषयात विशेष श्रेणीसह एमए झालेल्या असून त्यांना सुवर्ण पदक प्राप्त झालेले आहे. त्यांचे संगीताचे पुढील शिक्षण पुणे येथील विजय बक्षी यांच्याकडे सुरू आहे. वरील कलाकारांना सुमेध थत्ते हार्मोनियमवर, तर प्रसाद कुलकर्णी तबल्यावर साथ करतील. सूत्रसंचालनाची जबाबदारी चिन्मय घैसास सांभाळणार आहेत. हा कार्यक्रम सर्वांना खुला असल्याचे कळविण्यात आले आहे.