प्रतिनिधी / म्हापसा
काँग्रेसचे सक्रिय कार्यकर्ते, माजी जिल्हा पंचायत सदस्य, वेर्ला काणका पंचायतीचे विद्यमान सरपंच, प्राईम टिव्ही चॅनलचे मालक तथा संचालक मिल्टन मार्कीस यांचे नाताळाच्या दिवशी सायं. 4 वाजण्याच्या दरम्यान गोमेकॉत निधन झाले.
चार दिवसापूर्वी मार्कीस यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यांना प्रथम म्हापशातील खासगी इस्पितळात व नंतर गोमेकॉत पुढील उपचारांसाठी पाठविण्यात आले होते. गुरुवारी सायंकाळी त्यांना काणका येथील निवासस्थानी घरी आणण्यात आले. शुक्रवारी सायंकाळी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने म्हापसा जिल्हा आझिलो इस्पितळात नेण्यात आले. त्यांची प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना त्वरित गोमेकॉत पाठविण्यात आले. तेथील डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार सुरू केले मात्र उपचार सुरु असतानाच त्यांची प्राणज्योत मावळली.
मिल्टन मार्कीस सलग 30 वर्षे राजकीय क्षेत्रात आहेत त्यांनी पाचवेळी सरपंचपद भूषविले आहे. एक वेळा त्यांच्या पत्नी व्हेनेसा मार्कीस सरपंच झाल्या आहे. सुमारे अडीच तप त्यांनी राजकीय प्रवास केला. मल्टिन मार्कीस हे काँग्रेसचे धडाडीचे कार्यकर्ते होते. बार्देशात आमदारांना निवडून आणण्यासाठी त्यांनी महत्त्वाती भूमिका बजावली होती. माजी मंत्री अशोक साळगावकर, चंद्रकांत चोडणकर तसेच गेल्या निवडणुकीत विनोद पालयेकर यांना निवडून आणण्यासाठी त्यांचा सिंहाचा वाटा होता. जिल्हा पंचायत निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार निवडीसाठीही त्यांनी सक्रिय वाटा घेतला होता. मिल्टन मार्कीस यांनी जिल्हा पंचायत निवडणुकीत काँग्रेसचे दोन्हीही उमेदवार निवडून आणण्यासाठी अहोरात्र कष्ट केले होते. शिवोली मतदारसंघात गोरगरिबांसाठी ते सदैव झटले. आपल्या कारकीर्दित त्यांनी 25 वर्षे राजकीय प्रवास केला त्यात ते जिल्हा पंचायत सदस्य, पंच सदस्य आदी अन्य वेगवेगळी पदे भूषविली. काँग्रेस पक्षाचा उमेदवार निवडून आणण्यासाठी ते सदैव झटले. त्यांच्या जाण्याने काँग्रेस पक्ष एका सच्चा कार्यकर्त्याला मुकला आहे असे श्रद्धांजली वाहताना काणका गावचे समाजसेवक दत्ताराम पेडणेकर म्हणाले.
सच्चा मित्र हरपला- मंत्री मायकल लोबो मिल्टन हे आपल्या कुटुंबातील होते. काँग्रेस पक्षाचे सच्चे कार्यकर्ते होते. सदैव हसतमुख प्रत्येकाच्या मदतीला धावणारे त्यांनी राजकारणात आपला एक वेगळा ठसा उमटला होता. एक दानशूर व्यक्तीमत्त्व व आजात क्षत्रू म्हणून त्यांची ओळख होती. एक हॉटेलीयर म्हणून परिचित. सर्वांना बरोबरीने घेऊन जाणारा नेता त्यांची उमीव आम्हाला सदैव भासेल असे कचरा व्यवस्थापन मंत्री मायकल लोबो श्रद्धांजली वाहताना म्हणाले.