प्रतिनिधी/ वास्को
वेलसांव किनाऱयावर रविवारी संध्याकाळी झालेल्या खूनाचा छडा लावण्यास वेर्णा पोलिसांना यश आले आहे. प्रकरणाला चोवीस तास उलटण्यापूर्वीच या खूनात गुंतलेल्या चार युवकांना पोलिसांनी गजाआड केले आहे. हे चौघेही गोवा सोडून पळण्याच्या तयारीत होते. मयत युवकाची ओळख पटलेली असून त्याचे नाव खागेन नाथ(25) आहे.
दक्षिण गोव्याचे पोलीस अधीक्षक पंकजकुमार सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक राजू राऊत देसाई, निरीक्षक शरीफ जाकीस व त्यांच्या इतर पोलिसांनी या खूनाचा तातडीने छडा लावला. पोलीस अधीक्षक पंकजकुमार सिंग यांनी या खून प्रकरणासंबंधी दिलेल्या माहितीनुसार वेलसाव किनाऱयावर एका युवकाचा ठेचून खून करण्यात आल्याची माहिती मिळाल्यानंतर या प्रकरणाच्या तपासासाठी पोलिसांची चार पथके तयार करण्यात आली होती. जारी केलेल्या तपासात पोलिसांना काही सी.सी. टी.व्ही. फुटेज तसेच अन्य काही धागे दोरे सापडले होते. त्यामुळे तपासाला अधिक गती मिळाली व खून झालेल्या अज्ञात युवक कोण व त्याच्याबरोबर कोण होते याचाही पत्ता लागला. पोलीस अधीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार मयत युवकाबरोबर अन्य चार युवक होते. 25 ते 27 वयोगटातील हे युवक आसाम राज्यातील असून ते हल्लीच मजूरीची कामे करण्यासाठी गोव्यात आले होते. पाचही एकमेकांचे मित्र आहेत. ते झुआरीनगरातील बीर्ला भागात एकत्रच राहात होते. खून प्रकरणात अटक केलेल्यांची नावे दुलाल दास, मनाश नाथ, मनाश दास व रिदीप दास अशी आहेत.
रविवारी मयत खागेन नाथ याच्यासह चारही संशयीत आरोपी वेलसाव समुद्रकिनाऱया पार्टी करण्यासाठी गेले होते. या ठिकाणी मौजमजा करताना त्यांनी मद्य प्राशन केले होते. दारूच्या नशेत त्यांच्यामध्ये किनाऱयावरच भांडण झाले. या भांडणात रागाच्या भरात खागेन याला दारूच्या बॉटल्स, दगड व लाकडाचा वापर करून ठेचून मारण्यात आले. त्यानंतर चौघे जण घटनास्थळावरून पसार झाले. रात्रीच्या वेळी एक बस पकडून तीघे जण मडगाव रेल्वे स्थानकावर आले. ते गोव्यातून निसटण्याच्या प्रयत्नात होते. परंतु कोंकण रेल्वे पोलिसांच्या ते हाती लागले. त्यानंतर त्यांना वेर्णा पोलिसांनी गजाआड केले. चौथा आरोपी बीर्ला झुआरीनगर येथे पोलिसांच्या हाती लागला. पोलीस अधीक्षक पंकजकुमार सिंग व उपअधीक्षक राजू राऊत देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली वेर्णा पोलीस निरीक्षक शेरीफ जाकीस या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत. वरीष्ठ अधिकाऱयांच्या मार्गदर्शनाखाली उपानिरीक्षक प्रविण सिमेपुरूषकर, उपनिरीक्षक संकेत, रियांका तसेच हवालदार गिरीष नाईक, विदेश नाईक, संतोष पवार, नेवील फर्नांडिस, अशिष चिल्कया, शिपाई अजित शिरोडकर व निलेश कोणकर या पोलिसांनी ही कारवाई यशस्वी केली.