एमवायएस टी-20 क्रिकेट स्पर्धा
क्रीडा प्रतिनिधी /फोंडा
मडकई युवक संघाने आयोजित केलेल्या अखिल गोवा एमवायएस टी-20 क्रिकेट स्पर्धेत पहिल्या दिवसाच्या सामन्यात वेलिंग क्रिकेटर्स व एस्टीलो लिजेन्ड्स संघांनी विजय नोंदवून पुढील फेरीत प्रवेश केला. मडकई पंचायत मैदानावर ही स्पर्धा खेळविण्यात येत आहे.
पहिल्या सामन्यात वेलिंग क्रिकेटर्सने कुळे क्रिकेटर्सवर 4 गडी राखून विजय मिळविला. विजयी 116 धावांचे उद्दिष्टय़ वेलिंग क्रिकेटर्सने सरफराज नवाझच्या 37 व विकास देसाईच्या 22 धावांच्या जोरावर 17.1 षटकात 6 गडय़ांच्या मोबदल्यात पार केले. नामदेव व महादेवने प्रत्येकी 2 गडी बाद केले. तत्पूर्वी कुळे क्रिकेटर्सने निर्धारीत 20 षटकात 8 बाद 115 धावा केल्या. साईश नाईकने 55 धावा फटकावल्या. सरफराज नवाझ व सर्वेश नाईकने प्रत्येकी 2 गडी बाद केले. सरफराज नवाझ सामनावीर ठरला. दुपारच्या सामन्यात एस्टीलो लिजेन्ड्सने आयुष क्रिकेटर्सचा 34 धावांनी पराभव केला. एस्टीलो लिजेन्ड्सने प्रथम खेळून 19.1 षटकात सर्वबाद 130 धावा केल्या. आदित्य नाईकने 41 व सय्यद बद्रीने 25 धावा केल्या. संदेश पाटीलने 3 तर गौरेश नाईकने 2 गडी बाद केले. प्रत्यूत्तरात आयुष क्रिकेटर्सने 18.4 षटकात सर्वबाद 97 धावा जमविल्या. मंगेश नाईकने 43 धावांचे योगदान दिले. सय्यद बद्रीने 3 तर अजिंक्य नाईकने 2 बळी मिळविले. सय्यद बद्रीला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.