सांखळी/प्रतिनिधी
सांखळी मतदारसंघात भाजपने विजय संपादन केल्याने कार्यकऱयांनी आपापल्या भागात विजयी जल्लोष साजरा केला. परिसरात मोटारसायकल रॅली काढण्यात आली. पुन्हा डॉ. प्रमोद सावंत यांनाच मुख्यमंत्रीपद मिळणार असल्याने सांखळी मतदार संघातील नागरिक आनंदीत आहेत.
गोव्यात भाजपसमोर अनेक आव्हाने असून देखील मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राज्यात चांगले काम केले. कोरोना महामारी, तौक्ते वादळ, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न, पर्यावरण संरक्षण इत्यादी विषय त्यानी यशस्वी रित्या हाताळल्याने गोव्यतील जनतेने त्यावर विश्वास ठेवला. त्यामुळे भाजपला 20 जागा मिळवता आल्या.
भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार डॉ. प्रमोद सावंत यांनी 11561 मते मिळून विजयश्री खेचून आणला. सांखळीत हॅट्ट्रिक साधण्यास यश मिळवले असल्याने ग्रामीण तसेच शहरी भागात भाजप कार्यकर्त्यांनी विजयी जल्लोष केला. सांखळी मतदारसंघात खनिज खाणी, बेरोजगारी हे मुख्य मुद्दे नजरे समोर ठेवून सांखळी मतदारसंघात नागरिकांनी मतदान केल्याचे निदर्शनास येत आहे.
पाळी, वेळगे, सुर्ला, कुडणे, आमोणा, न्हावेली, हरवळे, तसेच सांखळी नगरपालिका क्षेत्रात काँग्रेसचे धर्मेश सगलानी यांनाही 11175 मते मिळाली. खाण पट्टय़ात त्यांना चांगला प्रतिसाद लाभला, मात्र विजयश्री त्यांच्या पासून दूरच राहिला. ते दोन वेळा काँग्रेसच्या तिकीटवर हरले आहेत. या मागे अनेक कारणे असू शकतात. सांखळी मतदारसंघात आरजी पक्षानेही मगो, आप सारख्या पक्षांना मागे टाकून 708 मते मिळवून तिसरा क्रमांक मिळवला आहे.
सांखळी मतदारसंघात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत कोणत्याही परिस्थितीत निवडून येऊ नये यासाठी खास चक्रव्यूह रचना करण्यात आली होती. या चक्रव्यूहात काही भाजप कार्यकर्तेही अडकले होते. निवडणूक पूर्वी दोन दिवस खास योजना आखण्यात आल्या. खाण अवलंबित, बेरोजगार, लोकांना यात सामिल करण्यात आल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.