क्रीडा प्रतिनिधी / मडगाव
लढतीच्या शेवटच्या क्षणी ब्रायन मास्कारेन्हसने नोंदविलेल्या गोलमुळे वेळसाव स्पोर्ट्स अँड कल्चरल क्लबने गोवा फुटबॉल संघटनेने आयोजित केलेल्या गोवा प्रोफेशनल लीग फुटबॉल स्पर्धेत आला पहिला विजय साकारला. काल हा सामना जीएफएच्या धुळेर मैदानावर खेळविण्यात आला व यात वेळसाव क्लबने पणजी फुटबॉलर्सला 2-1 गोलानी पराभूत केले.
जॅस्लॉय मॉनिज आणि ब्रायन मास्कारेन्हस यांनी वेळसाव स्पोर्ट्स अँड कल्चरल स्पोर्ट्स क्लबसाठी तर अक्रम यादवाडने पणजी फुटबॉलर्ससाठी गोल केले. विजयाच्या तीन गुणानी वेळसाव क्लबचे आता 4 तर पणजी फुटबॉलर्सचे 6 गुण झाले आहेत.
पहिल्या सत्रात वेळसाव क्लबच्या रोहन रॉड्रिग्जने दोन वेळा गोल करण्याच्या संधी गमविल्या. 39व्या मिनिटाला ब्रायन मास्कारेन्हसच्या पासवर जॅस्लॉय मॉनिजने गोल नोंदवून वेळसाव स्पोर्ट्स क्लबला आघाडीवर नेले. त्यानंतर लगेच त्यांच्या रोमारियोची गोल करण्याची नामी संधी सदोष फटक्यामुळे हुकली. दुसऱया सत्रात पणजी फुटबॉलर्स संघाने चांगला खेळ केला. त्यांच्या वाल्मिकी मिरांडा आणि जॉयसन गावकर यांचे गोल करण्याचे यत्न थोडक्यात हुकले. त्यानंतर 79व्या मिनिटाला अक्रम यादवाडने गोल करून पणजी फुटबॉलर्ससाठी सामना 1-1 असा बरोबरीत आणला. सामना बरोबरीत सुटणार असे वाटत असताना वेळसाव स्पोर्ट्स क्लबच्या ब्रायन मास्कारेन्हसने गोल करून विजय नोंदविला.