नवी दिल्ली / वृत्तसंस्था
गेल्या आठ-पंधरा दिवसात देशात ब्लॅक फंगस अर्थात म्युकरमायकोसिस आजाराने डोके वर काढलेले असतानाच दिल्लीतील एम्स रुग्णालयाच्या संचालकांनी काही सावधगिरीच्या उपाययोजना सुचविल्या आहेत. ब्लॅक फंगसचा धोका टाळण्यासाठी रक्तातील साखरेचे नियंत्रण संतुलित राखणे महत्त्वपूर्ण असून स्टेरॉईड्स कधी द्यायचे याबद्दल सावधगिरी बाळगली पाहिजे, असे रणदीप गुलेरिया यांनी सांगितले आहे. तसेच या आजारावर लवकर उपचार सुरु केले, तर रुग्ण यातून सुरक्षित बरा होतो, असे मेदांता रुग्णालयाचे अध्यक्ष डॉ. नरेश त्रेहान यांनी स्पष्ट केले आहे.
केंद्र सरकारने जारी केलेल्या निर्देशानुसार ब्लॅक फंगसला आता साथीचा आजार संबोधले जात आहे. रुग्ण वाढत असल्याने केंद्र सरकारने राज्यांना सतर्क केले असून या आजाराच्या रुग्णांची माहिती वेळोवळी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. तेलंगणा आणि राजस्थान या राज्यांबरोबरच आता उत्तर प्रदेशनेही ब्लॅक फंगसला ‘महामारी’ असे संबोधले आहे. दरम्यान, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोरोनाबाधित रुग्णांनी स्टेरॉइड न घेण्याचा सल्ला आरोग्यमंत्र्यांनी दिला आहे. ब्लॅक फंगसचा निरोगी व्यक्तींवर परिणाम होत नाही. परंतु, अशक्त रोग प्रतिकारशक्ती असणाऱयांना संसर्ग होण्याचा धोका जास्त असतो, असेही वैद्यकीय तज्ञांचे मत आहे.