प्रतिनिधी / वाळपई
गोमंतकातील सुप्रसिद्ध वेळुस सत्तरी येथील रवळनाथ देवस्थानचा पारंपारिक व धार्मिक कालोत्सव मंगळवार दिनांक 16 फेब्रुवारी पासून साजरा होणार आहे. यानिमित्त पूर्वतयारी जोरात सुरू करण्यात आली असून देवस्थानच्या अंतर्गत होणारे सर्व पारंपारिक उपक्रम साजरे करण्यात येणार असल्याची माहिती आयोजन समितीच्यावतीने देण्यात आलेली आहे.
वाळपई शहरातील कालोस्तव म्हणून या देवस्थानाची वेगळी अशी ओळख आहे .मंगळवार दिनांक 16 फेब्रुवारी रोजी गवळण काला व त्यानंतर सुप्रसिद्ध मामा मोचेमाडकर दशावतार नाटय़ कंपनीतर्फे दशावतार नाटकाचा प्रयोग सादर करण्यात येणार आहे. बुधवार दिनांक 17 फेब्रुवारी रोजी दशावतार नाटकाचा प्रयोग सादर करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. यानिमित्त सकाळपासून भाविकांसाठी देवदर्शनचा कार्यक्रम होणार आहे .त्याचप्रमाणे ओटी भरणे व गाऱयाणे घालण्याचा पारंपरिक कार्यक्रम सुरू राहणार असून भाविकांनी याची नोंद घ्यावी व मोठय़ा प्रमाणात उपस्थित राहून देवदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजन समितीच्यावतीने करण्यात आले आहे.