मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालण्याची मागणी
प्रतिनिधी / म्हापसा
वेस्ट बंगाल व ओरीसा येथील नागरिक जे पंचतारांकित हॉटेल, शॅक, हट आदी ठिकाणी राज्यात काम करीत होते मात्र ते गोव्यात योग्य वाहतुकीविना अडकून पडलेले आहेत त्यांना गावात जाण्यासाठी रेल्वे नसल्याने शॅक मालक, हॉटेल मालक यांनी आपण स्वतःहून पैसे गोळा करून या सुमारे दीड हजार वेस्ट बंगाल ओरीसाच्या नागरिकांना गावी पाठविण्यासाठी तयारी केली आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी याकडे त्वरित लक्ष घालून या सर्वांना गावी पाठविण्यासाठी खास ट्रेनची व्यवस्था करावी अशी मागणी कचरा व्यवस्थापन मंत्री मायकल लोबो यांनी पत्रकार परिषदेतून केली आहे.
आम्ही या कामगार वर्गांचा खर्च उचलण्यास तयार आहे. लॉकडाऊनच्या काळात या सर्व कामगार वर्गांना मालकांनी पगार तसेच त्यांच्या जेवणाची व्यवस्था केली आहे. सध्या हॉटेल, शॅक बंद असल्याने ते छोटय़ा झोपडपट्टीत शॅकच्यामागे राहत आहे. आता पावसाळा सुरू होणार आहे. यंदा पर्यटक हंगाम असाच गेला. सर्वांवर उपासमारीची पाळी आली आहे. उत्तर व दक्षिण गोवा शॅक मालक संघटनेचे अध्यक्ष जॉन लोबो व कार्दोज यावेळी उपस्थित होते. त्यांनीही या कामगार वर्गांना गावी पाठविण्याची तयारी दर्शविली असल्याचे मंत्री लोबो म्हणाले.
बंगाली नागरिक अकडून पडले
श्रमिक रेल्वे हीमाचल प्रदेश, मध्यप्रदेशला जाते. मात्र वेस्ट बंगालला ट्रेन जात नाही. मुख्यमंत्र्यांनी या ट्रेनची येत्या 4 दिवसात तयारी दर्शवावी अन्यथा या सर्वांना बसद्वारे गावी पाठविण्याची तयारीही आम्ही दर्शविली असल्याचे मंत्री लोबो यांनी सांगितले. हॉटेलमध्ये काम करणारे 850 व शॅकवर काम करणारे 850 मिळून दीड हजाराच्या आसपास ओरीसा व वेस्ट बंगाल येथील कामगार वर्ग राज्यात अडकून पडलेले आहेत अशी माहिती मंत्री लोबो यांनी दिली. सध्या हे सर्वजण वैफल्यग्रस्त झाले आहे त्यांना कामही नाही आणि हाती पैसेही नाही यासाठी कोकण रेल्वेचे मुख्य अधिकारी कुणाल तसेच जिल्हाधिकाऱयांनी यात लक्ष घालून ट्रेनची सोय करावी अशी मागणी त्यांनी केली.
गोव्यात येणाऱया रेल्वे मुख्यमंत्र्यांनी त्वरित बंद कराव्यात– मंत्री मायकल लोबो
राज्यातील जे नागरिक गोव्याबाहेर होते ते सर्व पुन्हा गोव्यात आलेले आहे. राज्यात आता कोरोनाचे रुग्ण झटपट वाढत आहेत. रात्री उशीरापर्यंत 36 रुग्ण आढळून आले. मुख्यमंत्र्यांनी मागचा पुढचा विचार न करता गोव्यात कुठल्याच रेल्वेला थांबू देऊ नये तसेच यापुढे गोव्याबाहेरील कुठल्याच नागरिकांना प्रवेश देऊ नये तेव्हाच कोरोना नियंत्रणात येईल असे कचरा व्यवस्थापन मंत्री मायकल लोबो यांनी सांगितले. आम्ही सर्व आमदार एकमताने गोव्यात येणाऱया रेल्वे त्वरित बंद कराव्यात अशी मागणी करणार असल्याचे मंत्री लोबो यांनी सांगितले. सर्व राज्यातील बॉर्डरवर कडक बंदोबस्त तसेच सर्व चेकनाक्यावर अधिक सीआर पीएफ बंदोबस्त वाढवावा अशी मागणी लोबो यांनी केली.
मुख्यमंत्र्यांनी रेल्वेसेवा करून द्यावी– जॉन लोबो
दरम्यान उत्तर गोव्याचे शॅक मालक अध्यक्ष जॉन लोबो व दक्षिण गोव्याचे कार्दोज हेही यावेळी उपस्थित होते. वेस्ट बंगाल व ओरीसाच्या कामगार वर्गांना गावी पाठविण्यासाठी आम्ही स्वतःहून पुढाकार घेऊन पैसे गोळा केल्याचे स्पष्ट केले. यासाठी मायकल लोबो यांनी पैशाची कोणतीही मागणी केली नसल्याचे ते म्हणाले. काही त्यांच्या विरोधात नाहक अफवा उठवित असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांनी या लोकांसाठी रेल्वेची व्यवस्था करून द्यावी जेणेकरून हे कामगार वर्ग सुखरूप आपल्या गावी जातील असे त्यांनी स्पष्ट केले.