अर्धा नर अन् अर्धी मादी : नरासारखे मोठे पंख, उजव्या भागात मादीसारखे अंडाशय
वृत्तसंस्था / न्यूयॉर्क
अर्धा नर आणि अर्धी मादी असलेला पक्षी संशोधकांनी शोधून काढला आहे. याचे नाव रोज-ब्रेस्टेड ग्रूजबीक्स आहे. या पक्ष्याच्या एका हिस्स्यात नरासारखे काळे आणि मोठा पंख आहे. तर दुसऱया हिस्स्यात करडय़ा आणि पिवळय़ा रंगाचा पंख आहे. याच्या छातीवर कुठल्याही प्रकारच्या खुणा नसून हे मादी पक्ष्याचे लक्षण आहे. पक्षी जेव्हा नर आणि मादी दोन्ही असतो, तेव्हा त्याला गाएंड्रोमॉरफिज्म म्हटले जाते अशी माहिती याचा शोध घेणाऱया पेन्सिलवेनियाच्या पाउडरमिल नॅचरल रिझर्व्हच्या संशोधकांनी दिली आहे.
नराचे दोन स्पर्म दोन न्युक्लियस असलेल्या मादीच्या अंडय़ाशी मिळतात तेव्हा अशा पक्ष्याचा जन्म होतो. अशा स्थितीत भ्रूणात नर आणि मादी दोन्हींचेही क्रोमोजोम येतात. 64 वर्षांपूर्वी अमेरिकेच्या पाउडरमिल एव्हिएशन रिसर्च सेंटरमध्येही असेच प्रकरण आढळले होते. हा माझ्या जीवनातील अत्यंत अद्भूत अनुभव राहिला आहे. पक्ष्यांची गणना सुरू असताना हा पक्षी आढळून आल्याचे संशोधिका एनी लिंडसे यांनी सांगितले आहे.
मादीप्रमाणे अंडी देऊ शकते
हा पक्षी उत्तर अमेरिकेत आढळतो, तो स्थलांतर करून मेक्सिको तसेच दक्षिण अमेरिकेतही पोहोचू शकतो. सर्वसाधारणपणे पक्ष्यांच्या डाव्या हिस्स्यातील ओवरीच सक्रिय असते. या पक्ष्यातही डावा हिस्सा मादीसारखा आहे. याचमुळे तो अंडी देऊ शकतो आणि प्रजननही करू शकते.
भविष्यात हा पक्षी नराप्रमाणे काम करणार का मादीप्रमाणे हे त्याच्या आवाजावर निर्भर असेल. हा पक्षी नराप्रमाणे गुणगुणल्यास मादी आकर्षित होईल. अन्यथा हा स्वतः नर पक्ष्यांकडे आकर्षित होऊ शकतो. अशी प्रकरणे अत्यंत दुर्लभ असतात आणि ती अनेक प्रकारची नवी माहिती देतात, असे लिंडसे यांनी म्हटले आहे.