जिल्ह्यातील कोरोनाबळींची संख्या 14 वर
ऑनलाईन टीम / मिरज
वैद्यकीय पंढरी मिरज शहरात सोमवारी रात्री कोरोनाचा पहिला बळी गेला. मिरज-मालगांव रस्त्यावर अमननगर येथे एका 53 वर्षीय व्यक्तीचा कोरोनाने मृत्यू झाला. मिरज शहरासह तालुक्यातील मृतांची संख्या दोनवर पोहचली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबळींची संख्या आता 14 वर गेली आहे. सोमवारी शहरात एकाच दिवशी सात रुग्ण वाढले.
कोरोनाचा आता वैद्यकीय पंढरी मिरजेतही प्रकोप झाला आहे. गेल्या चार दिवसात रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. शिवाजी रोडवरील दोन रुग्णालयामध्ये कोरोनाचे रुग्ण सापडल्याने वैद्यकीय पंढरीत खळबळ उडाली आहे. या रुग्णालयात क्वारंटाईन केलेल्या अन्य व्यक्तींनाच कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट होत आहे. शहरात सध्या ब्राम्हणपुरीत दोन, रमा उद्यान, मुजावर गल्ली, कबाडे गल्ली, रेवणी गल्ली, वाळवे गल्ली, इस्त्रायलनगर, शांतीसागर कॉलनी याठिकाणी प्रत्येकी एक रुग्ण सापडले असून, येथे कंटेन्मेंट झोन करण्यात आला आहे. यापूर्वी तालुक्यातील विजयनगर येथे कोरोनाचा पहिला बळी गेला. त्यानंतर मालगांव येथे एका महिलेचा कोरोनाने मृत्यू झाल्याने तो दुसरा बळी होता. सोमवारी रात्री उशिराने मिरज-मालगांव रस्त्यावरील अमननगर येथे एका 53 वर्षीय व्यक्तीचा कोरोनाने मृत्यू झाला. वैद्यकीय पंढरी मिरज शहरातच कोरोनाचा बळी गेल्याने भीतीचे वातावरण आहे. मिरज तालुक्यात एकूण मृतांची संख्या तीनवर पोहचली आहे.