ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्र राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयातील स्थानिक विद्यार्थ्यांसाठी 70 टक्के जागा राखून ठेवण्याचा निर्णय रद्द करण्यात आला आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी आज विधानसभेत याची घोषणा केली. त्यामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
महाराष्ट्रातील वैद्यकीय महाविद्यालयांचे मराठवाडा, विदर्भ आणि उर्वरित महाराष्ट्र असे वर्गीकरण करून स्थानिक विद्यार्थ्यांसाठी 70 टक्के जागा आरक्षित ठेवल्या जातात. तर अन्य 30 टक्के जागांवर राज्यातील इतर भागातील विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. तसेच अन्य भागातील महाविद्यालये कमी असल्याने त्या विद्यार्थ्यांवर अन्याय होत असल्याने हा निर्णय रद्द करण्यात यावा अशी मागणी पालक आणि विद्यार्थ्यांकडून केली जात होती. अखेर आज विधानसभेत हा निर्णय रद्द करण्यात आला असल्याची घोषणा अमित देशमुख यांनी केली आहे.
दरम्यान, या निर्णयानंतर आमदार धीरज देशमुख यांनी ट्विट करत शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना दिलेला शब्द पूर्ण केला आहे असे म्हटले आहे.
स्थानिक विद्यार्थ्यांना 70 टक्के जागांवर प्रवेश देण्याच्या निर्णयामुळे प्रवेश परीक्षेत चांगले गुण असूनही अनेक विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू शकत नव्हता. मात्र, आज घेतलेल्या निर्णयामुळे म्हणजेच आरक्षण रद्द केल्यामुळे आता राज्यातील विद्यार्थ्यांसाठी असलेल्या जागांवर गुणवत्ता यादीनुसार प्रवेश होतील. तसेच गुणवत्ता निकषांमध्ये बसत असल्यास विद्यार्थी राज्यातील कोणत्याही भागांतील महाविद्यालयात प्रवेश घेऊ शकणार आहेत.