मंत्री डॉ. के. सुधाकर यांची घोषणा : कोविड मार्गसूचीचे पालन करणे सक्तीचे
प्रतिनिधी / बेंगळूर
कोरोना परिस्थितीमुळे बंद असणारी राजीव गांधी आरोग्य विज्ञान विद्यापीठांतर्गत येणारे वैद्यकीय, दंतवैद्यकीय, आयुष, पॅरामेडिकल, नर्सिंग आणि फार्मसी कॉलेज 1 डिसेंबरपासून सुरू करण्यात येतील, अशी घोषणा वैद्यकीय शिक्षणमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी केली.
चित्रदुर्ग येथे शुक्रवारी पत्रकारांशी ते बोलत होते. महाविद्यालये सुरू करण्यासंबंधी अलिकडेच राज्य सरकारने जारी केलेल्या मार्गसूचीचे काटेकोरपणे पालन करण्याची सूचना डॉ. सुधाकर यांनी ट्विटरवर दिली आहे. राज्यातील पदवी, पदव्युत्तर, डिप्लोमा आणि अभियांत्रिकी महाविद्यालये 17 नोव्हेंबरपासून सुरू होत आहेत. राज्यात शिक्षण घेणारे काही वैद्यकीय विद्यार्थी परराज्यातील आहेत. त्यामुळे राजीव गांधी आरोग्य विज्ञान विद्यापीठांतर्गत कार्यरत असणारी वैद्यकीय महाविद्यालये 1 डिसेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे, असे ते म्हणाले.
राज्यातील शाळा-पदवीपूर्व महाविद्यालये सुरू करण्यासंबंधी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना डॉ. सुधाकर यांनी, हा विषय चर्चेच्या टप्प्यात आहे. शिक्षणापेक्षा मुलांचे आरोग्य महत्त्वाचे आहे. याच्या आधारेच शाळा केव्हा सुरू कराव्यात यासंबंधीचा निर्णय लवकरच घेण्यात येईल, असे स्पष्ट केले.
राज्य सरकारने यापूर्वीच पदवी महाविद्यालये सुरू करण्यास हिरवा कंदील दाखविला होता. त्यासाठी मार्गसूची जारी करून त्याचे पालन करण्याची सूचना केली होती.
बेंगळूरमध्ये विद्यार्थ्यांना मोफत बसप्रवासाची व्यवस्था
कोरोना परिस्थितीमुळे शाळा-महाविद्यालये अद्याप सुरू झालेली नाहीत. त्यामुळे परिवहन महामंडळाकडून विद्यार्थ्यांना सवलतीच्या दराने पास वितरीत करण्यात आलेले नाहीत. मात्र, 17 नोव्हेंबरपासून पदवी, अभियांत्रिकी, डिप्लोमा महाविद्यालये सुरू होणार आहेत. त्यामुळे बेंगळूरमध्ये विद्यार्थ्यांना मोफत बसप्रवास करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. बेंगळूर शहर परिवहनने हा निर्णय घेतला आहे. मागील वर्षाचे पास, स्मार्ट कार्ड दाखवून विद्यार्थ्यांना मोफत प्रवास करता येईल.