मगो कार्यकर्ते बखले यांचा पत्रकार परिषदेतून आरोप
वार्ताहर /मडकई
तळावली पंचायतीचे माजी उपसरपंच सुदेश भिंगी हे मगो पक्षाचे कधीच कार्यकर्ते नव्हते, त्यांनी पक्षाचे कार्यही कधी केलेले नाही. ते मतदारसंघाच्या विकासाकरीता भाजपामध्ये गेलेले नसून, स्वतःचा वैयक्तिक फायदा करून घेण्यासाठीच तसेच त्यांची काही प्रकरणे उघडय़ावर पडू नये म्हणूनच भाजपात गेले असल्याचा आरोप मगो पक्षाचे कार्यकर्ते प्रदीप बखले यांनी पत्रकार परिषदेतून केला आहे.
कवळे पंचायत सभागृहात घेण्यात आलेल्या या पत्रकार परिषदेला तळावली पंचायतीचे पंच सदस्य हर्षल तळावलीकर, पंच सदस्य भारती नाईक, बांदोडा पंचायतीचे पंच सदस्य वामन नाईक, कवळे पंचायतीच्या उपसरपंच मनुजा नाईक, पंच सदस्य उषा नाईक व सुर्यकांत सावंत आदी उपस्थित होते. सुदेश भिंगी भाजपात गेले असले तरी मगो पक्षावर त्याचा काहीही परिणाम होणार नाही. मगो नेते आमदार सुदिन ढवळीकर यांनी सरकारी नोकरी दिलेल्या व शिक्षणासाठी मदत केलेल्या कार्यकर्त्यानाच जमवून त्यांनी हा भाजप प्रवेश केला असल्याचा आरोप बखले यांनी केला आहे.
मगो पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते जयवंत भिंगी यांचा अपवाद वगळल्यास सर्व भिंगी कुटूंबीय माजी मुख्यमंत्री आमदार रवी नाइं&क यांचेच कार्यकर्ते होते. कॅटरींगचा व्यवसायही आमदार रवी नाईक यांनीच त्यांना करण्यास प्रवृत्त केलेले असल्याचे या पत्रकार परिषदेत बखले यांनी स्पष्ट केले. 1999 साली मगो पक्षाच्या तिकीटावर आमदार सुदिन ढवळीकर यांनी निवडणूक लढविण्यासाठी माजी जिल्हा पंचायत सदस्य विनोद नागेशकर, बांदोडा पंचायतीचे माजी उपसरपंच प्रताप फडते व जयवंत भिंगी यांनी माजी मुख्यमंत्री शशिकलाताई काकोडकर यांच्याकडे विनंती करून आमदार ढवळीकर यांना मगो पक्षाची तिकीट दिली होती. एवढाच सहभाग जयवंत भिंगी यांचा होता, असे बखले यांनी सांगितले.
1989 साली झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीवेळी भिंगी सर्व कुंटूबिय माजी मुख्यमंत्री तथा फोंडय़ाचे विद्यमान आमदार रवी नाईक यांच्याबरोबर होते. पूढे माजी मुख्यमंत्री आमदार रवी नाईक काँग्रेसमध्ये गेले. तेव्हाही ते त्यांच्या बरोबरच होते. 1994 साली माजी मुख्यमंत्री श्री. नाईक यांचा पराभव केंद्रिय मंत्री तथा खासदार श्रीपाद नाईक यांनी केला होता. त्यावेळी सुदेश भिंगींना कुणीही वाली नव्हता. 1999 व 2002 सालच्या निवडणूकीत सुध्दा सुदेश भिंगी मगो नेते तथा आमदार सुदिन ढवळीकर यांच्या बरोबर नव्हते, असे बखले यांनी सांगितले. सुदेश भिंगींच्या विनंतीनुसार 2007 सालच्या निवडणुकीवेळी सुर्यकांत सावंत व तळावली पंचायतीचे माजी सरपंच नारायण शेणवी तळावलीकर यांनी त्यांना आमदार सुदिन ढवळीकर यांच्याकडे आणले होते. त्या पंचायतीच्या निवडणूकीत आमदार सुदिन ढवळीकर यांनी भिंगी यांना पंच सदस्य म्हणून निवडून आणले व पंचायतीचे उपसरपंच ही बनविले.
2020 साली झालेल्या जिल्हा पंचायतीच्या निवडणुकीत उतरण्यासाठी सुदेश भिंगी यांनी मगो पक्षाचे ज्येष्ठ नेते आमदार सुदिन ढवळीकर यांच्याकडे मगो पक्षाच्या तिकीटाची मागणी केली होती. केंद्रीय समितीच्या झालेल्या बैठकीत ही तिकिट नाकारल्यामूळे त्यांनी पक्षाविरूध्द बंड केले. स्वतंत्र उमेदवारी मगो पक्षा विरूध्द दाखल केली. यावरून ते पक्षाचे कार्यकर्ते नव्हते हे सिध्द होत असल्याचा टोला भिंगीवर टीका करताना बखले यांनी लगावला.