तरुण भारत संवाद प्रतिनिधी / बार्शी
वैराग ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम स्थगित करण्याबाबत नगरविकास विभागाने निवडणुक आयोगाला सुचित केल्यासंदर्भातची माहिती माजी मंत्री दिलीप सोपल यांनी दिली आहे.
सोपल यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, सोपल यांनी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी करून पाठपुरावा केल्यानंतर शिंदे यांनी नगरविकास विभागाला निवडणूक आयोगाला वैराग नगरपंचायत करण्यासाठीची प्रक्रिया प्रशासकीय पातळीवर अंतिम टप्प्यात असल्याने निवडणूक आयोगाने घोषित केलेला वैराग ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम स्थगित करण्यासंदर्भात सूचना केली होती. त्याप्रमाणे निवडणूक आयोगाकडून सदर नगरविकास विभागाच्या सूचनेनुसार लवकरच वैराग ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम स्थगित केल्याबाबत प्रसिद्धीकरण करण्यात येईल.
महाविकासाघाडी आघाडी सरकारने सोपल यांच्या मागणीप्रमाणे तात्काळ दखल घेत वैराग नगरपंचायतचा निर्णय व अंमलबजावणीसाठी तत्परता दाखविल्याबद्दल सोपल यांनी ठाकरे आणि शिंदे यांचे भेटुन आभार मानले आहेत. वैराग नगरपंचायतच्या निर्णयामुळे वैराग शहराचे विकासाचे स्वप्न पूर्ण होईल, पायाभुत सुविधांसाठी मोठ्या प्रमाणात निधीची उपलब्धता होईल असा आशावाद सोपल यांनी व्यक्त केला आहे.