दर्शनासाठी ऑनलाईन नोंदणीची व्यवस्था
वृत्तसंस्था/ कटरा
कोरोना संकटकाळात भाविकांसाठी सुमारे 6 महिन्यांपासून बंद राहिलेले माता वैष्णोदेवीचे मंदिर रविवारपासून खुले झाले आहे. प्रारंभिक दिवसांमध्ये केवळ 2 हजार भाविकांना दर्शन घेता येणार आहे. कोरोना संसर्गापूर्वी मंदिरात दररोज 50-60 हजार लोक दर्शनासाठी येत होते.
वैष्णोदेवी मंदिर जम्मू-काश्मीरच्या त्रिकुटा पर्वतरांगांवर स्थित आहे. मंदिर सुमारे 5,200 फुटांच्या उंचीवर आणि जम्मूपासून 61 किलोमीटर तर कटरापासून 13 किलोमीटर अंतरावर आहे. यात्रेच्या पहिल्या आठवडय़ात 1,900 भाविक जम्मू-काश्मीरचे आणि अन्य राज्यांमधील 100 भक्त प्रतिदिन दर्शन करू शकणार आहेत.
दर्शनासाठी भाविकांना ऑनलाईन नोंदणी करावी लागत आहे. सर्व भाविकांच्या मोबाईलमध्ये आरोग्य सेतू डाउनलोड असणे अनिवार्य आहे. मास्क, सोशल डिस्टन्सिंग आणि सॅनिटायजेशनची काळजी घ्यावी लागणार आहे. भाविकांचे थर्मल स्कॅनिंगही केले जाणार आहे. 10 वर्षांपेक्षा कमी वयाची मुले, गरोदर महिला, 60 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या लोकांना दर्शनाची अनुमती दिली जाणार नसल्याचे श्री माता वैष्णोदेवी श्राइन बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश कुमार यांनी सांगितले आहे.
कोविड-19 शी संबंधित लक्षणे दिसून आल्यास संबंधिताला दर्शन करण्यापासून रोखण्यात येणार आहे. कटराहून बाणगंगा, अर्द्ध-कुंवारी आणि सांझीछतच्या मार्गाने मंदिराच्या ठिकाणी पोहोचता येणार आहे. अन्य राज्यांच्य भाविकांचा कोरोनासंबंधीचा निगेटिव्ह अहवाल हॅलिपॅड आणि दर्शनी डय़ोढी येथे तपासला जाणार आहे. कोविड-19 चा निगेटिव्ह अहवाल असलेल्या भाविकांना मंदिरात जाऊ दिले जाणार आहे. भाविकांच्या सुविधेसाठी बॅटरीयुक्त वाहन, रोप-वे आणि हेलिकॉप्टर सेवा सुरू केली जाणार आहे.