प्रतिनिधी / बेळगाव
धारवाड उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार वॉर्ड पुनर्रचना व आरक्षण जाहीर करण्यात आले नाही. मात्र, बेंगळूर उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार केवळ वॉर्ड आरक्षण जाहीर करण्यात आल्याने निकालाचा फेरविचार करावा, अशा मागणीची याचिका धारवाड उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी न्यायालयाने नोटीस बजावली असून याचिकेची सुनावणी गुरुवार दि. 4 रोजी होणार आहे. त्यामुळे शहरवासियांचे लक्ष न्यायालयाच्या सुनावणीकडे लागले आहे. मनपा वॉर्ड पुनर्रचना चुकीची झाली असल्याने उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. वॉर्ड पुनर्रचना आणि आरक्षण रद्द करून नव्याने जाहीर करण्यात येईल, असे प्रतिज्ञापत्र नगरविकास खात्याने न्यायालयात सादर केले होते. त्यामुळे वॉर्ड पुनर्रचना आणि आरक्षण नव्याने जाहीर करून निवडणुका घेण्याची सूचना धारवाड उच्च न्यायालयाने दिली होती. मात्र सदर न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी नगरविकास खात्याने अद्याप केली नाही. आरक्षण जाहीर करून निवडणूक घेण्याबाबत बेंगळूर उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार नगरविकास खात्याने वॉर्डनिहाय आरक्षण जाहीर केले आहे.