बेळगाव : महापालिका वॉर्ड पुनर्रचना आणि आरक्षणाबाबत बेंगळूर उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचा फेरविचार करावा, अशी याचिका धारवाड उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. याचिकेची सुनावणी गुरुवार दि. 4 रोजी होती. मात्र सदर सुनावणी पुन्हा लांबणीवर पडली आहे.
वॉर्ड पुनर्रचना आणि आरक्षणाबाबत न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेबाबत सुनावणी होईल, अशी अपेक्षा होती. मात्र सुनावणीचा क्रमांक आला नसल्याने सुनावणी झाली नाही. नगरविकास खात्याने तात्कालिक आरक्षण जाहीर करून हरकती घेतल्या होत्या. मात्र त्यानंतर अंतिम आरक्षण जाहीर करण्यात आले नाही. तसेच म्हणणे मांडण्यासाठी नगरविकास खात्याने दोन आठवडय़ाचा अवधी घेतला होता. निवडणूक आयोगाने तक्रार दाखल करून अंतिम आरक्षण जाहीर झाले नसल्याने निवडणुका घेण्यास विलंब होत असल्याचे म्हणणे मांडले आहे. त्यामुळे गुरुवारी सुनावणी होईल, अशी अपेक्षा होती. तसेच सुनावणीकडे शहरवासियांचे लक्ष लागून आहे. पण सुनावणी झाली नसल्याने पुन्हा हिरमोड झाला. पुढील सुनावणीची तारीख जाहीर झाली नाही.