व्यवस्थित माहिती-आराखडा उपलब्ध नसल्याने गोंधळ
प्रतिनिधी /बेळगाव
महापालिका वॉर्डची रचना करण्यात आली. मात्र नेमका वॉर्ड कसा आहे? कुठुन सुरुवात होते? कोणत्या गल्लीचा समावेश आहे? असे अनेक प्रश्न नागरिकांसमोर उभे ठाकले आहेत. यापूर्वी वॉर्डची सुरुवात मजगावपासून करण्यात आली होती. मात्र नव्याने करण्यात आलेल्या वॉर्ड पुनर्रचनेनुसार एक क्रमांकाच्या वॉर्डची सुरुवात शहराच्या मध्यवर्ती भागापासून होते. त्यामुळे वॉर्डबाबत इच्छुकांसह शहरवासियांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
मध्यवर्ती भागामध्ये वॉर्ड क्र. 1 ची सुरुवात झाल्यानंतर सर्कल पद्धतीने वॉर्डची रचना करण्यात आली आहे. संपूर्ण शहर आणि उपनगरात असलेल्या यापूर्वीच्या वॉर्डचा क्रमांक बदलला आहे. यामुळे नव्याने वॉर्ड क्रमांक किती येतो, याची माहितीदेखील नागरिकांना नाही. याची माहिती घेण्याचा प्रयत्न नागरिकांनी केला. पण महापालिकेकडून कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. केवळ हद्द सांगून महापालिकेच्या अधिकाऱयांनी आपली जबाबदारी झटकली आहे.
पांगुळ गल्लीसह परिसरात येणाऱया गल्ल्या म्हणजे शहराचा मध्यवर्ती भाग आहे. मध्यवर्ती भागात विविध व्यवसाय असून मुख्य बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. या मुख्य बाजारपेठेला वॉर्ड क्रमांक 1 म्हणून निश्चित करण्यात आले आहे. या बाजारपेठेचे महत्त्व पहिल्या क्रमांकावर आहे. यामुळेच पुनर्ररचनेनुसार या भागाचा समावेश आता वॉर्ड क्रमांक एकमध्ये झाला आहे. मध्यवर्ती भागापासून वॉर्डची सुरुवात झाली असून गोलाकार पद्धतीने वॉर्डची पुनर्रचना केल्याने वॉर्डबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
वॉर्ड पुनर्ररचनेबाबत न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्याने वॉर्ड पनर्ररचनेचा मुद्दा स्पष्ट झाला नव्हता. मात्र याचिकेचा निकाल लागण्यापूर्वीच निवडणुकीची घोषणा झाल्याने वॉर्ड रचनेबाबत गोंधळ निर्माण झाला आहे. वॉर्ड पुनर्ररचनेबाबत 2018 मध्ये आराखडा आणि माहिती प्रसिद्ध झाली होती. तसेच वॉर्डपुनर्ररचनेची माहिती केवळ कन्नड भाषेत असल्याने मराठी आणि अन्य भाषिकांची गैरसोय झाली आहे. वॉर्ड पुनर्ररचनेची माहिती मराठी भाषेमधून देण्याची मागणी केली असता महापालिकेकडून टाळाटाळ करण्यात येत आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनादेखील वॉर्डबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.